आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गंभीर घटना:हरीण, मोरांच्या हत्येच्या चौकशीची मागणी करत सामाजिक कार्यकर्त्याचे आत्मदहन

नांदेड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लोहा तालुक्यातील मौजे चौंडी येथील घटना; वन विभागाला दिले हाेते निवेदन

वन विभागातील बंधाऱ्याच्या बोगस कामासह हरीण व मोरांच्या हत्येची चौकशी करणे व इतर मागण्यांसाठी लोहा तालुक्यातील मौजे चौंडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते शिवदास संभाजी ढवळे (५२) यांनी २८ रोजी वन विभागाला आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी पहाटे ५ वाजता चोंडीजवळील वन विभागाच्या जमिनीत स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून घेतले. दरम्यान, माळाकोळी पोलिस ठाण्यात ढवळे यांचे कुटुंबीय व कार्यकर्त्यांनी गर्दी करून शिवदास ढवळे यांना न्याय देण्याची मागणी केली.

चौंडी परिसरातील वन विभागाच्या जमिनीवर मागील काही वर्षांपूर्वी मनरेगातून मातीनाला बांधकाम करण्यात आले होते. या वेळी चार हरीण व १० मोरांची हत्या झाली होती. यासंदर्भात ढवळे यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौकशी करत दोषींवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी दोषींना पाठीशी घालत कारवाई केली नाही, असे सांगत ढवळे यांनी वेळोवेळी निवेदन देत कारवाई करण्याची विनंती केली. शेवटी त्यांनी आत्मदहनाचा इशारा देऊन २८ एप्रिल रोजी वन विभागाच्या सर्व्हे नंबर ६४, १३२, १३३ या ठिकाणी असलेल्या मातीनाला बांध येथे पहाटे ५.३० वाजता अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेत आत्मदहन केले आहे. या वेळी माळाकोळी पोलिस ठाणे येथे मुलगा जनार्दन शिवदास ढवळे यांच्या फिर्यादीवरून माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास गिते व अन्य पाच आरोपींविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ढवळे यांनी आत्मदहन करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अटकेसाठी पथके रवाना
माळाकोळी पोलिस ठाणे येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीलेश मोरे, उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांनी भेट देऊन नातेवाइकांशी चर्चा केली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गतीने करत आरोपींना अटक करण्यासाठी तीन पथके रवाना केली. पुढील तपास माळाकोळी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक डोके यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

घातपात झाला असावा
मुलगा जनार्दन शिवदास ढवळे म्हणाले की, माझ्या वडिलांनी या पूर्वीही अशा प्रकारे निवेदन दिली होती. मात्र, आत्मदहन केले नव्हते. या वेळी त्यांचा काहीतरी घातपात झाला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

सर्व दोषींवर कार्यवाही करा
माळाकोळी पोलिस ठाणे येथे आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान यांनी भेट दिली. ते म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दुःखदायक असून संबंधित घटनेत दोषी असलेल्या सर्वच आरोपी व यंत्रणा यांच्यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे. या संदर्भाने आपण जिल्हा पोलिस अधीक्षकांशी बोललो अाहे. पोलिसांनी केलेल्या दुर्लक्षामुळे संबंधित घटना घडली अाहे.

हे प्रकरण वन विभागाशी संबंधित
सामाजिक कार्यकर्ते शिवदास ढवळे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे वन विभागाशी संबंधित घटना आहे. - माणिक डोके, सहायक पोलिस निरीक्षक, माळाकोळी पोलिस ठाणे.

बातम्या आणखी आहेत...