आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या व्हिडिओतून मनसेचा सवाल:न्यायालयीन निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी करणारा पक्ष तेढ निर्माण करणारा कसा?

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात मशिदीवरील भोंगे उतरले पाहिजे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. या अल्टीमेटम नंतर राज्यात विविध ठिकाणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने नवा व्हिडिओ जारी करत राज्य सरकारला प्रतिप्रश्न केला आहे. राज्यात न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी करणारा पक्ष तेढ निर्माण करणारा कसा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आमदार (प्रमोद राजू) पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच राज ठाकरे अखंड समाजासाठी लढत असल्याचे देखील आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले, प्रमोद पाटील
'आम्ही जी मागणी करतोय, तो आधीच सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे. बघायला गेलं तर आम्ही फक्त त्याच्या योग्य अंमलबजावणीची मागणी करतोय. मग, जो पक्ष न्यायालयाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीची मागणी करतो तो पक्ष समाजात तेढ निर्माण करणारा कसा..? हिंदुजननायक मा. श्री. राजसाहेब ठाकरे आता अखंड समाजासाठी लढतायत. आपण सर्वांनी ह्या हिंदुजननायकाच्या पाठीशी हिंदूंच्या अस्तित्वासाठी उभं राहायला हवं !'

वाद संपलेला नाही
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दादर मधील सभेत मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर ठाणे आणि औरंगाबाद येथे झालेल्या सभेत देखील राज ठाकरे यांनी हा मुद्दा लावून धरला. त्याच बरोबर 3 मे रोजी ईदनंतर 4 मे पासून भोंग्यांविरोधात राज्यभरात आंदोलन करण्याचे आदेश मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले. ज्याठिकाणी मशिदींवर भोंगे वाजतील त्याच्यासमोर हनुमान चालीसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते. यावरून राज्यातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक मनसैनिकांना ताब्यातही घेतले होते.

365 दिवस आंदोलन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन केवळ एका दिवसाचे नसून 365 दिवसांचे असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. यावरून अद्याप हा वाद मिटला नाही तर पुढील काळातही हा वाद कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आगामी दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे तोपर्यंत तरी हा वाद मिटण्याची शक्यता दिसत नाही. आता राज्य सरकार परिस्थिती कशाप्रकारे हाताळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांच्यावर गुन्हा
या प्रकरणांमध्ये समाजात तेढ निर्माण केल्याच्या विरोधात तसेच सभेसाठी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद मधील सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मनसेच्या इतरही अनेक पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. आता या गुन्ह्यासंदर्भात औरंगाबाद पोलिस कोणती कारवाई करतात, याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...