आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा:ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना यंदाचा आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपेक्षित, वंचितांसाठी आपली हयात वेचणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने यंदाचा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ आणि आरोग्य सेवेत क्रांती करणारे माय लॅबचे संस्थापक हसमुख रावल यांना ‘आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार वितरण सोहळा होणार नसून बाबा आढाव यांना पुणे येथील हमाल पंचायत तर रावल यांना निवासस्थानी जाऊन सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली. कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ गेल्या पंचवीस वर्षांपासून “आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे यंदाचे पंचविसावे वर्ष आहे. एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांत समाजहिताचे कार्य अखंडपणे करत युवा पिढीला प्रेरक ठरणाऱ्या तसेच जुन्या पिढीबरोबरच नव्या पिढीचाही सन्मान व्हावा या उद्देशाने “आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्ष असून एकावन्न हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

आतापर्यंत प्रा. ग. प्र. प्रधान, बाळासाहेब भारदे, डॉ. अप्पासाहेब पवार, भाऊसाहेब थोरात, ना. धों. महानोर, मधुकरराव चौधरी, पी. डी. पाटील, डॉ. मोहन धारिया, डॉ. निर्मलाताई देशपांडे, क्रांतिवीर डॉ. नागनाथ नायकवडी, डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील, प्राचार्य पी. बी. पाटील, अॅड. रावसाहेब शिंदे, बाळासाहेब विखे पाटील, प्रतापराव भोसले, कल्लाप्पाण्णा आवाडे, डॉ. पतंगराव कदम, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, भि. दा. भिलारे गुरुजी, शंकरराव कोल्हे, विनायकराव पाटील, बी. जे. खताळ, गणपतराव देशमुख या तेवीस व्यक्ती आणि राजर्षी शाहू ट्रस्ट या संस्थेस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पहिल्या वर्षी युवा उद्योजक आणि बीव्हीजी इंडियाचे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांना व हिवरे बाजारचा सर्वांगीण विकास करणारे पोपटराव पवार यांना दुसऱ्या तर सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक विलासराव शिंदे यांना तिसरा, चौथ्या वर्षी हा पुरस्कार गणेश हिंगमिरे, पाचव्या वर्षी पुण्याच्या प्रदीप लोखंडे यांना आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...