आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरू येथील हॅपिनेस कार्यक्रमात पंचकर्म उपचार घेतल्यानंतर शिंदे गटाचे फायरब्रँड नेते शहाजीबापू पाटील यांनी तब्बल 9 किलो वजन कमी केले आहे. 24 डिसेंबरपासून विरोधकांच्या टीकेवर शहाजीबापूंची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती. यापाठीमागे हेच कारण होते. आता ते पुन्हा एकदा नव्या जोमाने विरोधकांना उत्तर देण्यासाठी तयार आहेत.
24 डिसेंबरपासून शहाजीबापू त्यांचे मित्र महेश पाटील यांच्यासोबत बंगळुरू येथील श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात पंचकर्म आणि सुदर्शन क्रिया करण्यासाठी गेले होते. त्यामुळे गेले 8 दिवस विरोधकांवर धडाडणारी ही तोफ शांत होती. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी गेलेले बापू दोन दिवसानंतर गायब झाले होते. यावेळी सांगोल्यात आलेल्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केल्यानंतरही शहाजीबापू पाटलांकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया समोर आलेली नव्हती.
असा होता बापूंचा दिनक्रम
बंगळुरू येथील आश्रमात शहाजीबापू पाटील यांचा दिनक्रम असा होता. पहाटे पाच वाजता उठून रोज दोन तास योगासने, त्यानंतर उकडलेल्या पालेभाज्या, कडधान्ये याचा नाश्ता दुपारी बौद्धिक गोष्टी ऐकणे आणि ध्यानधारणा, वाफेवर उकडलेल्या पालेभाज्या आणि चपातीचे पौष्टिक आणि शुद्ध शाकाहारी भोजन करायचे. दुपारी सुदर्शन प्रक्रिया आणि व्यायाम, संध्याकाळी मेडिटेशन. अशाप्रकारच्या भरगच्च कार्यक्रमात बापूंना श्वास घ्यायलाही उसंत नव्हती.
सांगोल्याला परतणार
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी हा कोर्स पूर्ण झाला. त्यानंतर शहाजीबापू पाटील आज बंगळुरू येथून पुन्हा सांगोल्याकडे परत जाण्यासाठी निघाले आहेत. या आठ दिवसाच्या कार्यक्रमामुळे शहाजीबापूंचे तब्बल नऊ किलो वजन कमी झाले आहे. त्यामुळे नव्या उत्साहाने बापू महाराष्ट्र गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.