आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीचे बडे नेते मंगळवारी पवारांच्या 'लोक माझे सांगाती' नामक आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभाला जमले होते. प्रसार माध्यमांतही या पुस्तकातील रंजक किस्स्यांची चर्चा सुरू होती. पण अचानक पवारांनी राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली अन् कार्यक्रमाचा नूरच पालटला...
शरद पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप झाला. त्यांच्या या निर्णयामुळे जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल आदी बड्या नेत्यांसह सर्वच लहान मोठे अचंबित झाले. सर्वजण पवारांना हा निर्णय रद्द करण्याची मागणी करू लागले. जयंत पाटलांसह अनेकांना यावेळी अश्रू अनावर झाले. पण पवारांनी हा निर्णय काही अचानक घेतला नाही. त्यांनी नुकतेच भाकरी फिरवण्याचे विधान करून याचे संकेत दिले होते.
शरद पवारांची 'पॉवर' कमी झाली होती का?
शरद पवारांनी मंगळवारी अचानक राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. त्यांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांना धक्का बसला. पण पवार आपल्या अशाच धक्कातंत्रासाठी ओळखले जातात. त्यांची प्रत्येक कृती व विधान महाराष्ट्रातील राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. पण गत काही दिवसांपासून राष्ट्रवादीतील त्यांची 'पॉवर' कमी होऊन अजित पवारांचा दबदबा वाढल्याचे चित्र निर्माण झाले होते.
असे म्हटले जात आहे की, या घटनाक्रमामुळे शरद पवार काहीसे नाराज होते. यामुळेच त्यांनी 2 दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याचे विधान करून आपल्या राजीनाम्याचे संकेत दिले होते. ते एका कार्यक्रमात म्हणाले होते - 'भाकरी वेळीच फिरवली पाहिजे. त्यात उशीर झाला तर करपू शकते. पक्षात आता ही वेळ आली आहे.'
शरद पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीत भविष्यात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवारांचे बोलायचे तर त्यांनी 'एनसीपी'साठी यापूर्वीही अनेकदा अडचण निर्माण केली आहे. 2019 मध्ये त्यांनी पक्षाशी बंडखोरी करून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता पुन्हा ते भाजपसोबत जाण्याची चर्चा रंगली आहे.
हा शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक?
सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा करून मास्टर स्ट्रोक लगावला आहे. गत काही दिवसांपासून अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसोबत बंडखोरी करून भाजपसोबत जाण्याची चर्चा रंगली आहे. या चर्चेवर शरद पवारांनी आपली रोखठोक भूमिका व्यक्त केली होती. 'हा निर्णय वैयक्तिक असू शकतो. पण राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही,' असे ते म्हणाले होते.
अजित पवारांच्या कथित संभाव्य बंडखोरीच्या बातम्यांमुळे एनसीपी कमकूवत होत असल्याच्या चर्चेनेही जोर धरला आहे. पण शरद पवारांनी अचानक अध्यक्षपद सोडण्याची घोषणा करून पक्षात पुन्हा एकदा प्राण ओतण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्यांचे नेते व कार्यकर्ते त्यांच्याकडे त्यांचा निर्णय बदलण्याची मागणी करत आहेत. अनेकजण तर रडून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले - शरद पवारांनी आपल्या राजीनाम्यावर फेरविचार करावा. पवार म्हणतील तेच पक्षात होईल. पक्षात बदल करण्याचे सर्वाधिकार त्यांच्याकडेच आहेत. तत्पूर्वी, जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते आपले अश्रू आवरत म्हणाले - पवारांनी थेट राजीनामा देण्याची गरज नव्हती. पवारांशिवाय आम्ही जनतेपुढे कसे जाणार? त्यांच्या या भूमिकेनंतर अजित पवारांनीही शरद पवारांना आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली.
दरम्यान, शरद पवारांच्या एका निर्णयामुळे अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस एकजूट झाल्याचे चित्र आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरही केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचीच चर्चा सुरू आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.