आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारार्थ:आज अन् उद्याही राष्ट्रवादीत शरद पवारांचाच अंतिम शब्द, तरीही राजीनाम्याचा 'डाव' टाकून नेमके काय साधले?

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवारांनी 3 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यावेळी पवारांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा करत एका निवड समितीची स्थापना केली. तसेच हीच समिती पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड करेल, असेही स्पष्ट केले.

त्यानंतर पक्षाच्या अनेक नेत्यांनी पवारांकडे राजीनामा परत घेण्याची मागणी केली. पण त्यांनी ठामपणे त्यांची मागणी फेटाळून लावली. पण रेटा वाढल्यामुळे त्यांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी 2-3 दिवसांचा अवधी मागून घेतला. आज शुक्रवारी समितीने नव्या अध्यक्षांची निवड करण्याऐवजी पवारांचाच राजीनामा फेटाळण्याचा एका ओळीचा प्रस्ताव मंजूर केला. यावरून या समितीचा राजीनामा फेटाळण्याचा अजेंडा पूर्वीपासूनच ठरला होता हे स्पष्ट होते. दुसरीकडे, पवारांनी समितीच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी आणखी काही दिवसांचा अवधी मागितला आहे.

राजीनाम्याचा अर्थ

राजकीय विश्लेषक पवारांच्या राजीनाम्याचे वेगवेगळे अर्थ काढत आहेत. निवडणूक आयोगाने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. त्यामुळे कदाचित पवारांना आता राष्ट्रीय अध्यक्षपदी राहण्याचे कोणतेही औचित्य उरले नसल्याचे वाटले असेल. पण त्यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी फोनवरून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. त्यावरून त्यांची राष्ट्रीय राजकारणातील उंची आजही अबाधित असल्याचे स्पष्ट होते.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शरद पवारांचा राजकीय अनुभव पाहता त्यांची भूमिका आणखी महत्त्वपूर्ण बनली आहे. हाच विचार पक्षाचे नेते पवारांना समजावून सांगत आहेत.

एका दगडात अनेक पक्षी गारद

शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला तेव्हा पक्षातील इतर नेत्यांशी कोणतीही चर्चा केली नव्हती. त्यांच्या राजीनाम्याची गोष्ट केवळ 4 जणांना म्हणजे त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, जावई सदानंद सुळे, पुतण्या अजित पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनाच माहिती होती. महाराष्ट्रात अजित पवार यांना शरद पवारांचा उत्तराधिकारी मानले जाते. पण पवारांच्या राजीनाम्यापूर्वी अजित पवार बंडखोरी करून आपल्या समर्थकांसह भाजपसोबत जाणार अशी चर्चा होती. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही रद्दबातल झाला होता. त्याचा फटका 83 वर्षीय पवारांच्या प्रतिमेला बसत होता.

त्यामुळे या स्थितीत शरद पवार अध्यक्षपदी कायम राहिले असते, तर कदाचित त्यांच्या पक्षाचीही गतही शिवसेनेसारखी झाली असती. यामुळे त्यांच्या प्रतिमेला आणखी फटका बसला असता. पण आता चित्र पूर्णतः बदलले आहे. पवारांच्या राजीनाम्यामुळे पक्षाचे सर्व नेते एकजूट झालेत. कार्यकर्त्यांतही नवचैतन्य संचारले आहे. त्यामुळे या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खरी 'पॉवर' आपल्याकडेच असून, पक्षाचा एकही कार्यकर्ता दुसऱ्या नेत्याच्या नावावर तयार नाही, हे पवारांनी दाखवून दिले. एका अर्थाने त्यांनी आपली खुंटी हलवून अधिकच मजबूत केली आहे.

राजीनाम्याच्या घोषणेतून काय साध्य झाले

पवारांच्या राजीनाम्यातून आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. ती म्हणजे, लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा अवधी शिल्लक असताना ते केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात विरोधकांना एकजूट ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. नव्हे तशी त्यांच्यात ताकदही आहे. पवार सध्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या प्रमुखपदी आहेत. म्हणजे, पवारांनी आपल्या राजीनाम्यातून पक्षातील संभाव्य फूट व विरोधकांना स्पष्ट संदेश देण्यासह आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या चर्चेवरही पूर्णविराम दिला आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसमधील शिवसेनेसारखे संभाव्य बंडाळीचे संकट शमले.
  • राष्ट्रवादीचे कॅडर व प्रामाणिक मतदार कुणासोबत उभे आहेत हे ही पवारांच्या राजीनाम्यामुळे स्पष्ट झाले.
  • महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्याचेही यामुळे सिद्ध झाले.

पवारांच्या मनधरणीत यश येईल?

राष्ट्रवादीच्या एकगठ्ठा नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी शरद पवारांना आपला राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पवार पुढे कोणते पाऊल टाकतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. विश्लेषकांच्या मते, पवार समितीचा राजीनामा मागे घेण्याचा निर्णय मान्य करून नव्या दमाने कामाला लागतील.

शरद पवारांशी संबंधित खालील बातमी वाचा...

लोक माझे सांगाती:राजीनामा फेटाळल्याचे कळवले, पण शरद पवारांनी वेळ मागितला; प्रफुल्ल पटेलांची माहिती

शरद पवार यांचा राजीनामा निवड समितीने एकमताने फेटाळला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावे, अशी शरद पवारांना विनंती करणार आहेत, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, त्यांनी आपल्या निर्णयासाठी थोडा वेळ हवा असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती पटेल पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधताना दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी...