आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:समाजाने वाळीत टाकलेले किन्नर आता हिंगोलीत कोरोना विरुद्धच्या लढ्यात उतरले; शहरात ठिकठिकाणी करताहेत जनजागृती

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • किन्नरांना त्यांच्या कामाचा मोबदला देणार : रामदास पाटील, मुख्याधिकारी

(मंगेश शेवाळकर)

समाजाने वाळीत टाकलेले किन्नर (तृतीयपंथी) देखील कोरोना विरुध्दच्या लढ्यात उतरले असून हिंगोली शहरात रविवारपासून (10 मे) त्यांनी ठिकठिकाणी थांबून नागरीकांना तसेच भाजी, फळे विक्रेत्यांना कोरोनापासून घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती सुरु केली आहे. त्यामुळे आता किन्नरही या लढ्यात महत्वाची भूमीका बजावणार आहेत.

हिंगोली शहरातील विविध प्रभागांमध्ये पालिकेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांचे पथक साफसफाईच्या कामाची पाहणी करीत होती. यावेळी महात्मा गांधी चौकातून काही किन्नर जात असतांना मुख्याधिकारी पाटील यांनी त्यांची चौकशी केली. त्यावर त्यांनी कामावर गेल्याचे सांगितले. यावेळी पाटील यांनी त्यांना कोरोना लढ्यात काम करणार का असा सवाल करताच एका क्षणाचाही विलंब न करता दहा जणांनीही तुम्ही व तुमचे पथक आमच्यासाठी दिवसरात्र काम करीत आहात, त्यामुळे आम्ही देखील काम करणार असे स्पष्ट केले.

दरम्यान, आज सकाळी आठ वाजता शहरातील पाच ठिकाणी भाजीपाला व फळबाजार सुरु झाल्यानंतर विनायक (नांव बदललेले) व त्याचे सहकारी पालिकेत आले. त्यांनी मुख्याधिकारी पाटील यांची भेट घेऊन थेट पाच ठिकाणचे बाजार गाठले. त्या ठिकाणी भाजीपाला विक्रेते व ग्राहकांना कोरोनाला हरविण्यासाठी काय करावे लागेल याची माहिती देत जनजागृती केली. या शिवाय मास्क बांधणे, वेळोवेळी हात धुणे याचे महत्व देखील पटवून दिले. ज्यांच्या कडे मास्क नाही त्यांना रुमाल बांधण्यास भाग पाडले. किन्नरांकडून होणाऱ्या जनजागृतीमुळे ओशाळलेल्या विक्रेते व ग्राहकांनी देखील त्यांच्याकडे किन्नर म्हणून न पाहता कोरोना विरुध्दचा योध्दा म्हणून त्यांच्या सुचना ऐकूण घेतल्या अन मास्क लावले.

हिंगोली शहरात दुपारी एक वाजेपर्यंत जनजागृतीचे काम केलेेल्या या किन्नरांनी दुपारी देखील शहरात फिरणाऱ्यांना घरातच थांबण्याचा सल्ला दिला. समाजाकडून नेहमीच हिन वागणुक मिळत असलेल्या किन्नरांनी सुरु केलेले काम चर्चेचा विषय बनले आहे.

त्यांना कामाचा मोबदला देणार : रामदास पाटील, मुख्याधिकारी

शहरात कोरोना विरुध्दच्या लढ्यामध्ये काम करणाऱ्या किन्नरांना कामाचा मोबदला दिला जाईल. त्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न आहे. या शिवाय त्यांना धान्याचे किटही दिले जाणार आहे. तसेच भाजीपाला विक्रीच्या दिवशी ते बाजारात थांबतील तर इतर वेळी जनजागृती करतील. यातून त्यांना रोजगार मिळणार असून कामाचा मोबदला मिळणार असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्‍नही सुटणार आहे.

बातम्या आणखी आहेत...