आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवा महिना लागला!:राज्यपाल महोदय, आठवा महिना लागला, निर्णयाचा पाळणा कितव्या महिन्यात हालणार? आमदार नियुक्तीवरून शिवसेनेची राज्यपालांवर बोचरी टीका

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांचा प्रश्नावरून सध्या चांगलेच राजकारण तापले आहे. नुकतेच न्यायालयाने कान टोचल्यानंतर राज्यपालांनी सरकारकडून आग्रह धरला जात नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांचे वय झाले असल्याचा टोला लगावला होता. या प्रकरणात आता शिवसेनेनेही राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

सरकारने 12 नावांची शिफारस करून आता आठवा महिना लागला. मात्र राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार? हे एकदा स्पष्ट करावे, असा टोला शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे.

काय म्हटले सामन अग्रलेखात-

भगतसिंग कोश्यारी यांच्याविषयी महाराष्ट्राच्या मनात व्यक्तिगत कटुता असण्याचे कारण नाही, पण राज्यपाल म्हणून त्यांचे वर्तन घटनाविरोधी व राजकीय बोटचेपेपणाचे आहे. राज्यपाल त्यांच्या पितृपक्षाच्या दबावाखाली काम करीत असतील तर पंतप्रधान मोदी यांनी घटनेची, लोकशाहीची ही घसरगुंडी रोखायला हवी. राजभवनांचा वापर करून सत्तापरिवर्तन वगैरे होत नाही व अफगाणिस्तानच्या अब्दुल गनी यांच्याप्रमाणे कोणी 'सरेंडर'ही होत नाही, हे प. बंगाल व महाराष्ट्रात दिसून आले. येथे जातीचेच आहेत हे येरागबाळ्यांनी समजून घ्यावे, असा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला आहे. तसेच राज्यपालांनी 80 व्या वर्षी पायी सिंहगड सर केला याचे कौतुक कुणाला नाही? पण लोकशाही व घटनेचा किल्ला ते पाडू पाहत आहेत, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हा सर्वत्र चेष्टेचा विषय झाला आहे. पदाचे इतके अवमूल्यन व घसरगुंडी राज्यपाल साहेबांनी करून ठेवली आहे. 12 नामनियुक्त आमदारांच्या नेमणुका फक्त राजकीय कारणांसाठीच रखडवून ठेवल्या आहेत, हे राजभवनातले शेंबडे पोरही सांगेल. मुंबईच्या हायकोर्टानेही राज्यपालांची सौम्य, सभ्य भाषेत टोपी उडवून विचारले की, 'निर्णयासाठी आठ महिने घेणे हे जरा जास्तच झाले. निर्णय घेणे तर राज्यपालांवर बंधनकारक आहेच!' तरीही घटनेचे कोणतेही बंधन पाळायला राज्यपाल तयार नाहीत. जोपर्यंत महाराष्ट्रात त्यांच्या मनासारखे सरकार शपथ घेत नाही तोपर्यंत 12 आमदारांच्या नियुक्त्या विसरा, असे राज्यपाल म्हणतात, असा उपरोधिक टोला शिवसेनेने राज्यपालांच्या भूमिकेवरून लगावला आहे.स्वातंत्र्य दिनी राज्यपाल झेंडा फडकविण्यासाठी पुण्यातील शासकीय कार्यक्रमात गेले. तेथे काँग्रेसचे जुनेजाणते नेते शरद रणपिसे यांनी राज्यपालांना विचारले, 'ते तेवढं 12 आमदारांच्या नियुक्त्या कधी करताय, तेवढं बोला!' यावर राज्यपालांनी थंडपणे सांगितले, 'राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीचा राज्य सरकार आग्रह करत नसताना तुम्ही कशाला आग्रह धरता?' राज्यपालांनी असे उत्तर देऊन पुन्हा एकदा स्वतःचा पाय स्वतःच्याच धोतरात गुंतवून घेतला मात्र, आमदारांच्या नियुक्त्यांबाबत सरकारने आग्रह धरायला हवा, म्हणजे नेमके काय करावे? त्यांच्या राजभवनात जमून टाळय़ा, थाळय़ा, घंटा वाजवून राज्यपालांचे लक्ष याप्रश्नी वेधून घ्यायचे, की आणखी काही करायचे? असा प्रश्न राज्यपाल कोश्यारी यांना केला आहे.

बातम्या आणखी आहेत...