आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा मेळावा:राज्याच्या अधिकारात केंद्राची ढवळाढवळ नको, हिंदुत्वाला खरा धोका उपटसुंभ नवहिंदुवाद्यांकडून : उद्धव ठाकरे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यघटनाकारांनी केंद्र अन राज्यांच्या अधिकाराची काटेकोर विभागणी केली आहे. देशातील सर्व राज्ये सार्वभौम आहेत. केंद्र तरी राज्याच्या कारभारात ढवळाढवळ करणार असेल तर घटनेची दुर्घटना होईल, असा गंभीर इशारा शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिला. हिंदुत्वाला परकीय आक्रमणांपासून धोका नसून खरा धोका तर या उपटसुंभ नवहिंदुवाद्यांकडून आहे, अशी खरमरीत टीका त्यांनी भाजपवर केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मांटुगा येथील षण्मुखानंद सभागृहामध्ये शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा पार पडला. या वेळी ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकार, भाजप, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला.

कुणाच्या कुटुंबावर वैयक्तिक, पत्नीवर मुलांवर खोटे आरोप करणे हे हिंदुत्व नाही. याला नामर्द किंबहुना अक्करमाशीपणा म्हणतात. सध्या छापा टाकून काटा काढला जात आहे. पण, हिंमत असेल तर पुढे या, सीबीआय, ईडी, एनसीबीच्या मागे लपू नका, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला दिले.

माझ्या भाषणानंतर अनेक जण चिरकायला कधी मिळते याची वाट पाहत आहेत. तुम्ही चिरका, मुसंड्या मारा, डोकी फुटतील, पण तडा जाणार नाही. माझा वाडा चिरेबंदी आहे, असे उद्धव म्हणाले. हर्षवर्धन पाटील तुमच्यात आले तर पवित्र झाले. गटाराचे पाणी तुमच्यात टाकले तर गंगा. ते पाणी दुसरीकडे कुठेही टाकले तर गटारगंगा कसे, असे उद्धव म्हणाले.

केवळ तुमची पालखी वाहत नाही म्हणून शिवैनिक भ्रष्ट झाला का, असा प्रश्न त्यांनी विचारला. आम्ही पालखीचे भोई जरूर आहोत. पण देशभक्तीच्या पालखीचे आहोत. तुमची पालखी वाहणारे आम्ही भोई नाही आहोत. तुमच्या पक्षाच्या पालख्या वाहण्यासाठी शिवसैनिकांचा जन्म झाला नाही, असे त्यांंनी ठामपणे सांगितले.

केंद्रीय गृहमंत्रालयाने हिंदुत्वाला धोका नाही, असे सांगितले. पण आता हिंदुत्वाला धोका परक्यांपासून नाही तर हे उपटसुंभ नवहिंदू उगवले आहेत त्यांच्यापासून धोका आहे, असा हल्ला त्यांनी भाजप व संघावर चढवला. सावरकर, गांधी शब्द उच्चारण्याची तुमची लायकी तरी आहे का, असे ते भाजप नेत्यांना म्हणाले.

केंद्र आणि भाजपला ललकारले, मोदी-भाजप-संघालाही सुनावले
- युती तुटल्याप्रकरणी उद्धव यांनी भाष्य केले. शिवसेनेला दिलेले वचन पाळले असते तरी मी राजकारणातून बाजूला झालो असतो, असे त्यांनी सांगतिले. पण, त्यांनी वचन तोडले. कारण त्यांच्या नशिबात नव्हते, असे सांगून ‘मैं तो फकीर हूं. झोली उठाके वगैरे’ असे कर्मदरिद्री विचार आमचे नाहीत,” अशा शब्दांत उद्धव यांनी सुनावले.

- “तुम्ही जे काही सांगत आहात, तुमची माणसे ऐकत नसतील तर हे मेळावे तरी कशाला?,” असा सवाल त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला केला. तुम्ही सर्वांचे पूर्वज एक होते म्हणता, मग उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे चिरडलेले शेतकरी काय परग्रहावरचे होते का, असा सवाल त्यांनी केला.

1. दसरा मेळाव्यात पहिल्यांदा इतर नेत्यांच्या भाषणांना फाटा दिला. त्याऐवजी विकासकामांची चित्रफीत दाखवली गेली. सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम गैरहजर होते.
2. प्रथेप्रमाणे व्यासपीठावर शस्त्रपूजन पार पडले. या वेळी उद्धव यांनी मराठी-अमराठी, स्पृश्य-अस्पृश्य, कोकणी-घाटी हा भेद गाडून मराठी माणसांनी एक होण्याची हाक दिली.
3. उद्धव यांनी आज प्रथमच भाषणात टिपणे आणली होती. नवी मुंबईतील जेएनपीटी बंदराचा ७५ टक्के सीएसआर निधी गुजरातला वळवल्याचे तसेच गुजरातला मिळणाऱ्या केंद्राच्या निधीत मोठी वाढ झाल्याच्या कॅग अहवालाचे त्यांनी वाचन केले.
4. या मेळाव्याला ठाकरे पूर्ण कुटुंब हजर हाेते. रश्मी ठाकरे तसेच आदित्य व तेजस उपस्थित होते. गजानन कीर्तिकर, सुभाष देसाई, संजय राऊत अग्रभागी होते.
5. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, आता तरी सुधरा. सत्तेची नशा वाईट असते, असे बजावत उद्धव यांनी मोदी-शहा जोडगोळीवर निशाणा साधला.

बातम्या आणखी आहेत...