आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोमवारपासून राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरचे शिवसेनेचे कार्यालय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला मिळणार की ते उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे कायम राहणार? अशी चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रात गत जून महिन्यात सत्तांतर झाले. त्यानंतर मुंबईत झालेल्या विधीमंडळ अधिवेशनातही शिवेसेनेचे कार्यालय शिंदे गटाला की ठाकरे गटाला मिळणार यावरून वाद झाला होता. त्यानंतर ठाकरे गटाने हे कार्यालय आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर आता नागपुरातही असा प्रकार घडत आहे.
पवार-दानवेंची धावाधाव
नागपूर विधान भवन परिसरात असणारे शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला देण्यात येत आहे. तसे लेखी आदेश लवकरच जारी होणार असल्याची कुणकुण विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना लागली होती. त्यानंतर त्यांनी लागलीच विधानभवनात धाव घेऊन विधीमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांना जाब विचारला. तसेच असा प्रकार अजिबात खपवून घेणार नाही, असा दमही भरला.
दानवेंनी भरला अधिकाऱ्यांना दम
विधीमंडळाच्या दस्तावेजांनुसार, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील गटच आजही खरी शिवसेना आहे. त्यामुळे शिंदे गटाला हे कार्यालय कोणत्या अधिकारात दिले जात आहे, असा सवाल दानवे यांनी यावेळी उपस्थित केला. दुसऱ्या गटाला एखादे कार्यालय द्यायचे किंवा नाही याचा निर्णय तुम्ही घ्या, पण आमच्या कार्यालयाला धक्का लावू नका, अशी तंबीही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना भरली.
शिंदे गटही आग्रही
या घटनाक्रमानंतर भागवत यांनी ठाकरे गटाला हे कार्यालय देण्यास अनुकूलता दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटही या कार्यालयासाठी आग्रही असल्यामुळे हा वाद चांगलाच ताणला जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले या प्रकरणी लवकरच भागवत यांना भेटून आपली भूमिका मांडणार असल्याची माहिती आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.