आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर किल्ले रायगड आला पाहिजे, जगभरातील पर्यटक आणि अभ्यासक या ठिकाणी आकर्षित झाले पाहिजेत हेच माझे स्वप्न आहे. ते लवकरच पूर्ण होणार, हा विश्वासही आहे. हिंदुस्थानातील प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जे रायगडाचे स्थान आहे, तेच माझ्याही मनात आहे. मराठा युद्धशास्त्राच्या दृष्टीने स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाचे अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. येथेच शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपती घराण्याच्या वैभवाची मुहूर्तमेढ रायगडावर रोवली गेल्याने भावनिकदृष्ट्या मी इथे जास्तच जोडला गेलो आहे. छत्रपती घराण्याचा वंशज या नात्याने गडाचे जतन व संवर्धनाची माझी जबाबदारी वाढते, याची मला पदोपदी जाणीव आहे.
गड, किल्ल्यांचे आकर्षण मला लहानपणापासूनच होते. कॉलेज जीवनात एनएसएसच्या माध्यमातून दुर्गभ्रमंती केली होती. वर्ष २००७ मध्ये ३३३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला छत्रपती घराण्याचा वंशज या नात्याने मला प्रमुख पाहुणे म्हणून रायगडवर आमंत्रित करण्यात आले. यापूर्वीही गडावर एक-दोन वेळा गेलो होतो. पण राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी एक गोष्ट प्रखरतेने माझ्या लक्षात आली की, ज्या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ‘छत्रपती’ ही बहुमानाची उपाधी त्यांनी धारण केली, त्या राजसदरेवरील मेघडंबरी रिकामी आहे आणि महाराजांची मूर्ती होळीच्या माळावर बसवण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने राजसदरेवरच शिवछत्रपतींची मूर्ती बसवावी आणि हा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्सव ग्लोबल व्हावा यासाठी प्रतिवर्षी ६ जून रोजी भव्य शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास सुरुवात केली. खूप मोठा संघर्ष केल्यावर २००९ मध्ये राजसदरेवरील रिकाम्या मेघडंबरीत शिवछत्रपतींची मूर्ती बसवण्यात आली. छत्रपतींची प्रतिमा या राजसदरेवर विराजमान झाली तो माझ्या आयुष्यातला सर्वात समाधानाचा क्षण आहे!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर येत असतात. आज हा लोकोत्सव झाला आहे. याचा स्थानिकांच्या अर्थचक्रावर सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यातूनच मग रायगडची युद्धशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेली बांधणी, नैसर्गिक जलस्रोतांचे केलेले जतन आणि प्रशासकीय उपयुक्ततेतून केलेली वास्तुरचनांची उभारणी जगासमोर आणण्यासाठी माझी धडपड सुरू आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभारलेल्या असंख्य गडकोटांच्या साहाय्याने, भूमिपुत्रांना संघटित करून जुलमी, परकीय राजवट उलथवून आपल्या पूर्वजांनी सार्वभौम स्वराज्याची स्थापना केली त्याचे जर कोण साक्षीदार असतील तर हे तट, बुरूज आहेत. या महादरवाजातून कधीतरी शिवछत्रपती-छत्रपती संभाजी महाराज आले असतील, याच दरवाजांनी त्यांचा आवाज ऐकला असेल. या वैभवाचं जतन, संवर्धन झालं पाहिजे. पुढच्या पिढीसाठी हा ठेवा राखला पाहिजे या भावना मनात उफाळून येतात.
राष्ट्रनिर्मितीसाठी आणि राष्ट्र चिरंतन ठेवण्यासाठी काही प्रतीकांची गरज प्रत्येक राष्ट्राला असते. आपल्याकडील गडकिल्ले हे राष्ट्राच्या अस्मितेची प्रतीकेच आहेत. गडावरील अष्टप्रधान मंडळाचे वाडे, तलाव, बुरूज, फरसबंद, अवघड वाटा हे सारे बघत असताना वाटते की, शिवकाळ किंवा शिवपूर्वकाळ कसा असेल? ज्या वास्तू आज आहेत किंवा काळाच्या ओघात जमिनीच्या खाली दडलेल्या आहेत त्या कशा असतील? इतिहासप्रेमींना, दुर्गप्रेंमीना, संशोधकांना त्या अभ्यासण्यासाठी उपलब्ध करता येतील का? यासारखे अनेक प्रश्न माझ्या मनात पिंगा घालत असतात. त्याचबरोबर आहे तो ऐतिहासिक ठेवा जतन व संवर्धन करणे, उत्खनन करून हा अमूल्य ठेवा अभ्यासासाठी जगासमोर येण्याची नितांत गरज आहे. या दृष्टीनेदेखील प्रयत्न चालू आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.