आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरविंद सावंत यांचा शिंदे सेनेला टोला:सोन्याची लंका असलेल्या रावणाला प्रभू श्रीरामाने पराभूत केले, ते हनुमान म्हणजेच निष्ठेच्या जीवावर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवी माता सर्वांना सुबुद्धी देवो, अशी प्रार्थना शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. ठाण्यामध्ये स्व. आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या ठेंभी नाका येथील दुर्गा देवीचे आशीर्वाद घेतल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी शिंदे आणि ठाकरे यांच्या दसरा मेळाव्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारले असता, मी आज दर्शनासाठी आलो आहे. त्यामुळे राजकीय भाष्य टाळणार असल्याचे ते म्हणाले. मात्र, बोलताना शिंदे सेनेची तुलना रावणाशी करण्यास ते विसरले नाही.

आपण सोन्याची लंका म्हणतो, ती सोन्याची लंका म्हणजे एक प्रकारे प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीला संपवण्यासाठी प्रभु श्रीरामाला हनुमानाची मदत मिळाली, म्हणजेच निष्ठेच्या साहाय्याने रामाने रावणाचा पराभव केला, असे म्हणत खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.

शिवसेनेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या मैदानावर पहिली सभा घेतली त्याच मैदानावर शिवसेनेची सभा होणार आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी पुढे चालू ठेवला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची परंपरा समर्थपणे पेलली असल्याचेही सावंत म्हणाले.

माणसांना सुबुद्धी देवो

श्रीदेवीच्या चरणी प्रार्थना करत अरविंद सावंत यांनी भवपाशात अडकलेल्या माणसांना देवी सुबुद्धी देवो अशी प्रार्थना केली. हा भवपाश आहे, याची त्यांना जाणीव नाही. मात्र त्यातून बाहेर पडण्याची सुबुद्धी त्यांना मिळो, एवढीच देवीच्या चरणी मागणी मी या निमित्ताने करत असल्याचे खासदार सावंत म्हणाले.

शिवसेनेला तयारी करावी लागत नाही

'रुखी-सुखी रोटी खायेंगे, फिर भी भगवा झेंडा लहराएगें' असे आमचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे शिवसैनिकांना पंचतारांकित व्यवस्था लागत नाही. तो मातीत बसतो, मातीत चालतो, शिवसैनिक हा या मातीशी एकरुप झाला आहे. त्यामुळे बाहेर दिसणाऱ्या सोंगांची शिवसैनिकांना गरज नाही. फक्त शिवसेना पक्षप्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी सैनिक जमा होत असतो. त्यासाठी वेगळी तयारी करण्याची आम्हाला आवश्यकता नाही. आमचे कान पक्षप्रमुखांचे विचार ऐकण्यासाठी आतापासूनच आतुरलेले आहे, असाच आमचा शिवसैनिक असल्याचे खासदार सावंत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...