आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब:'राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेचे कार्यकर्ते फोडत आहे; भाजपशी जुळवून घ्या, आपल्याच पक्षाला फायदा होईल'

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली आहे का?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक लेटर बॉम्ब पडला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, पुन्हा भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईल, असेही म्हटले आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दोन पानी पत्रं लिहीले आहे. या पत्राद्वारे त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला. या पत्रात त्यांनी म्हटले की, तुम्ही राजकारण बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त आपल्या मुख्यमंत्री पदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात. पण, काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे. त्यात काँग्रेस पक्ष स्वबळाची भूमिका घेत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे. आपल्याच सरकारमधील काही मंत्री केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत असल्याचा आरोपी त्यांनी यात केला.

ते पुढे म्हणतात की, आमचा तुमच्या नेतृत्वावर अढळ विश्वास आहे. कोरोना काळात आपण प्रचंड मेहनत घेऊन कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्र राज्याचा संभाळ केला आहे. त्याबद्दल आपले खरोखर कौतुक करावे तितके कमी आहे. महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार हा वंदनीय शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेबांना दिलेला शब्द व त्यांना दिलेले वचन पूर्ण झालेले आहे. आपण या पदाला न्याय दिला आहे व देत आहात. पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरु आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आप्पलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे माझे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे.

सरनाईक पुढे म्हणतात की, मागील दीड वर्षात मी आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी चर्चा केली. त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांचीच कामे कशी झटपट होतात, आपला मुख्यमंत्री असतानाही आपली कामे का होत नाही ? असा सवाल केला आमदारांमधून केला जात आहे. त्यामुळे आमदारांमध्ये अंतर्गत नाराजी पसरली आहे. एका विशिष्ट परिस्थितीत राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली. पण युती तोडून शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच, पुढच्या वर्षी मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि भविष्यात शिवसेनेला होईल. साहेब, तुम्ही योग्य निर्णय घ्यालच. माझ्या मनातील भावना तुम्हाला कळवल्या. लहान तोंडी मोठा घास घेतला. काही चुकले असेल तर दिलगिर आहे, असे सरनाईक यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...