आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेली अनेक दिवस शिवसेनेच्या आमदारांकडून निधी मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वी शिवसेनेचे नेते अनंत गिते यांनी ही असा आरोप केला होता. तर आता शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नसल्याचे सांगितले आहे. यावेळी बोलताना त्यांनी आम्ही ठाकरे सरकार म्हणायचे मात्र लाभ पवार सरकारचा, असे वक्तव्य केल्याने महाविकास आघाडीतील खदखद बाहेर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची सध्या डँबिसगिरी सुरु आहे. आम्ही आपले म्हणायचे आणि लाभ मात्र पवार सरकारचा होतो, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शिवसेनेचा निधी पळवतात, अशी टीका खासदार गजानन किर्तीकर यांनी केली आहे. रत्नागिरीच्या दापोली येथील एका कार्यक्रमात बोलत असताना खासदार किर्तीकर यांनी राष्ट्रवादीवर निधीवाटपाच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे.
एका आमदारावर किती भार असतो. त्याला अनेक गावांमध्ये पाहावे लागते. आता या शिर्दे गावापुरते बोलायचे झाले तर जी काही कामे असतील ती मी माझ्या परीने करतो. पण योगेश कदमांना माहिती आहे की स्पर्धा कशी सुरु असते. राष्ट्रवादीवाल्याची डँबिसगिरी कशी चालते. खरंतर सर्वात जास्त अडचण योगेश कदमांची होते. मला फारकाही त्रास नाही, पण फंड आणायचा कुठून हा प्रश्नही पडतो, असे म्हणत किर्तीकर यांनी निधीवाटपातील असमानतेवरची नाराजी बोलून दाखवली आहे.
शिवसेनेतून रामदास कदम आणि योगेश कदम यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांकडे असलेल्या जबाबदाऱ्या काढून घेण्यात येत आहे. तिथे अनिल परबांचे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येत आहे. आमदार योगेश कदम यांच्या गटाचे असलेले शिवसेनेचे तालुकाध्यक्ष, उपजिल्हाप्रमुख, विधासभा क्षेत्र प्रमुख यांची उचलबांगडी करून तेथे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पालकमंत्री अनिल परब यांनी केली होती.
त्यामुळे आमदार योगेश कदम यांना पक्षांतर्गत विरोधाला तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. तर दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पातही सर्वात जास्त निधी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांना त्यानंतर कॉग्रेसच्या मंत्रांच्या खात्यांना व सर्वात शेवटी अर्थसंकल्पातील केवळ 16 टक्के निधी शिवसेनेच्या मंत्र्याच्या खात्यांना मिळाला असल्याची टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. ती खरी आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.