आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांचा भाजपला टोला:'अयोध्येतील जमीन घोटाळ्याविरोधात आवाज उठवला तर हिंदुद्रोही-राजद्रोही ठरवले जाते, ही एक प्रकारची विकृतीच'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशावर प्रेम करणे व राज्यकर्त्यांवर प्रेम करणे या दोन भिन्न गोष्टी

अयोध्येतील जमीन घोटाळ्याविरोधात आवाज उठवला म्हणून भाजपचे नेते शिवसेनेला हिंदुद्रोही ठरवत आहेत. ही एकप्रकारची विकृती आहे, ही रामनिष्ठा नसून राजनिष्ठा आहे. याच्याशी देशभक्तीचा काडीमात्र संबंध नाही, असे परखड मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या रोखठोक सदरातून भाजपवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत रोखठोकमध्ये म्हणतात की, 'देशभक्ती आणि राजनिष्ठा या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. देशावर प्रेम करणे व राज्यकर्त्यांवर प्रेम करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपल्या देशात त्याची गल्लत होत आहे. स्वामीनिष्ठा ही राजनिष्ठा असू शकते. पण त्यास देशभक्ती कसे म्हणाल? नताशा नरवाल, देवांगना कलिता या आंदोलकांना दिल्ली उच्च न्यायालयाने एक वर्षानंतर मुक्त करताना सरकारच्या मनसुब्यांवर ताशेरे ओढले. सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतला म्हणून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्याच वेळी केरळ हायकोर्टाने लक्षद्वीप बेटावरील सिनेनिर्मात्या आयशा सुल्ताना यांनाही अंतरिम जामीन मंजूर केला. लक्षद्वीपच्या राजकीय प्रशासकांवर टीका केल्याबद्दल आयशा यांच्यावरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. आपल्या देशात राष्ट्रद्रोह इतका स्वस्त होईल असे वाटले नव्हते. स्वामीवर म्हणजे राजावर जो प्रेम करीत नाही तो राष्ट्रद्रोही या विचारावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आसुड ओढले आहेत.'

'सरकारविरुद्ध, पंतप्रधान, राष्ट्रपतींविरोधात बोलायचे नाही. तसे केले तर सरकार उलथविण्याचा कट रचला म्हणून खटले दाखल होतील. या भीतीवर सर्वोच्च न्यायालयाने उतारा दिला आहे. अयोध्येत राममंदिराच्या जमीन खरेदीवरून वादंग माजले आहे. हा राममंदिराचा जमीन घोटाळा असल्याचे संजय सिंह यांनी समोर आणले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी शिवसेनेसह अनेकांनी केली. संजय सिंह यांच्या दिल्लीतील घरावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. मुंबईत शिवसेना भवनावर मोर्चा काढून छाती पिटण्याचा कार्यक्रम पार पाडला. अयोध्येतील जमीन घोटाळ्याच्या चौकशीची जे मागणी करीत आहेत ते हिंदुद्रोही, राजद्रोही वगैरे ठरवून मोकळे झाले. ही एक प्रकारची विकृती आहे. धार्मिक स्थळांबाबत घोटाळय़ांची चौकशी करा असे सांगणाऱ्य़ांना राष्ट्रद्रोही म्हणणे ही विकृती आहे. ही रामनिष्ठा नसून राजनिष्ठा आहे. याच्याशी देशभक्तीचा काडीमात्र संबंध नाही.'

'देशनिष्ठा की राजनिष्ठा हा वाद सनातन काळापासून सुरूच आहे. आज जे नरेंद्र मोदींवर निष्ठा ठेवत नाहीत ते देशाचे नाहीत असे बोलले जाते. कधी काळी मोदींच्या जागी इंदिरा गांधी होत्या. ‘इंदिरा इज इंडिया, इंदिरा म्हणजेच भारत’ ही घोषणा त्याच राजनिष्ठेतून निर्माण झाली. त्याच इंदिरा गांधींचा पराभव 1978 साली हिंदुस्थानी मतदारांनी केला. इंदिरा हरल्या म्हणजे देश हरला, असे मानायचे काय? व्यक्ती येतात व जातात. देश तेथेच असतो. त्याचे कणखर पोलादी नेतृत्व राष्ट्रनिष्ठा घडवत असते. सत्य बोलणारे व राज्यकर्त्यांना आरसा दाखवणारे राष्ट्राचे शत्रू ठरवून तुरुंगात ढकलले जातात. हिंदुस्थानच्या विविध तुरुंगांत आज अशा कैद्यांचा आकडा नक्की किती आहे? असा दाखला देत राऊत यांनी सवाल उपस्थितीत केला.

'देश पहिला आणि राजा दुसरा. देशासाठी राजा. राजासाठी देश नव्हे. देशाची सुरक्षितता व देशाची व्यवस्था नीट रीतीने चालावी म्हणून राजा अस्तित्वात आला. राजाला आपला अंमल गाजविता यावा म्हणून देश अस्तित्वात आला असे नाही. राजांमध्येही वाईट आणि जुलमी राजे आहेतच. अशा वेळी जेव्हा त्या वाईट आणि जुलमी राजाच्या कृतीने देश बुडू लागतो. त्या वेळेला राजनिष्ठेला चिकटून राहणे म्हणजे उत्तम सद्गुण नव्हे. ती राष्ट्रनिष्ठा नाहीच नाही. राष्ट्र संकटात असतानाही जे फक्त राजनिष्ठ म्हणून वावरतात त्यांच्यापासून राष्ट्राला खरा धोका आहे. आज राष्ट्रद्रोह म्हणजे नक्की काय? ते कुणीच सांगू शकत नाही. कोणत्याही सरकारच्या ‘चुका’ दाखवणे हा काही राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न ठरू शकत नाही. आंदोलनात भाग घेऊन सरकारविरुद्ध घोषणा देणे, त्याबद्दल राजद्रोह, दहशतवादासारखी कलमे लावून बेमुदत तुरुंगात टाकणे या ‘राजनिष्ठेला’च कोणी राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती समजत असतील तर देश संकटात आहे' असेही राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...