आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेगा नोकरभरती:रखडलेली 72 हजार रिक्त पदांची मेगा नोकरभरती लागणार मार्गी- अशोक चव्हाण

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठा आरक्षण फेरविचार याचिकेचा निर्णय तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनतर

मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे राज्यातील रखडलेल्या ७२ हजार जागांच्या मेगा नोकरभरती प्रक्रियेबाबत मुख्य सचिव विभागनिहाय आढावा घेत असून, पुढील दोन-तीन दिवसांत त्यांचा अहवाल अपेक्षित आहे. त्यानंतर रखडलेली नोकरभरती मार्गी लागेल, अशी माहिती मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. मंगळवारी सह्याद्री अतिथिगृह येथे मराठा आरक्षणप्रश्नी बैठक झाली.

बैठकीनंतर बोलताना चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सखोल अभ्यास करून पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारस करण्यासाठी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे कामकाज सुरू झाले आहे. येत्या ३१ मेपूर्वी त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका आणि इतर पर्यायांबाबत निर्णय घेतला जाईल. मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने २२ सप्टेंबर २०२० रोजी अनेक निर्णय घेतले होते. त्या निर्णयांच्या अंमलबजावणी तत्काळ करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. तसेच मराठा समाजासाठी जाहीर झालेली शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती, वसतीगृह संदर्भातील सवलती यापुढेही सुरू राहतील असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. जुलै २०२० मध्ये सर्वाेच्च न्यायालयाने मराठा समाजाला लागू केलेल्या एसईबीसी आरक्षणास स्थगिती दिली. निकाल लागेपर्यंत राज्यातील नोकरभरती करु नका, असा दबाव मराठा समाजाच्या संघटनांनी सरकावर टाकला होता. परिणामी राज्यातील सरकारी नोकरभरती स्थगित केली होती. राज्य सरकारच्या विविध विभागात सुमारे ७२ हजार रिक्त पदे आहेत.

अांदोलने करण्यासाठी भाजपची समिती : मराठा आरक्षणाबाबत भारतीय जनता पक्षाने स्थापन केलेल्या समितीबाबत एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ही समिती मराठा आरक्षण कसे टिकवावे, याबाबत काही सकारात्मक सूचना मांडण्यासाठी गठीत झाली असावी असा आमचा समज होता. परंतु, ही समिती विधायक सूचना करण्यासाठी नव्हे तर आंदोलने करण्यासाठी स्थापन झाल्याचे दिसून येत असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

भाजपची मार्गदर्शक समिती
मराठा आरक्षणप्रश्नी प्रदेश भाजपने मार्गदर्शक समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पक्षीय पातळीवर भाजपने एक समिती नेमली आहे. त्या समितीला मार्गदर्शन करण्याचे काम मार्गदर्शक समिती करणार आहे. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मंगळवारी बैठक पार पडली. त्याला नारायण राणे, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...