आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपाेर्ट:माफ करा बाबासाहेब, चवदार तळ्याचे पाणी आम्ही आजही पिऊ शकत नाही

महाड9 महिन्यांपूर्वीलेखक: दिप्ती राऊत
  • कॉपी लिंक
महाडमधील हे एेतिहासिक चवदार तळे. हा हिरवा नजारा नसून दूषित पाण्यामुळे निर्माण झालेले शेवाळे आहे. - छाया : अशाेक गवळी - Divya Marathi
महाडमधील हे एेतिहासिक चवदार तळे. हा हिरवा नजारा नसून दूषित पाण्यामुळे निर्माण झालेले शेवाळे आहे. - छाया : अशाेक गवळी
  • जागतिक वारसा जपण्यात शासनास अपयश; पाणी पिण्यायाेग्य नसल्याचा प्रयाेगशाळेचा अहवाल

“हा संगर केवळ पाण्यासाठी नसून मूलभूत मानवी हक्कांसाठी आहे.’ - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हे शब्द सोनेरी अक्षरांनी कोरलेल्या चबुतऱ्याभोवतीचे हिरवे पाणी मन विषण्ण करते. डॉ. बाबासाहेबांच्या पहिल्या सत्याग्रहामुळे इतिहासात अजरामर झालेल्या चवदार तळ्याची आजची अवस्था धक्कादायक आहे. देशभरातून येणारे अनुयायी मोठ्या श्रद्धेने जे पाणी सोबत घेऊन जातात ते पाणी सांडपाण्याच्या प्रदूषणामुळे एवढे दूषित झाले आहे की मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेने हे पाणी “अनफिट फॉर ड्रिंकिंग’ असल्याचा धक्कादायक अहवाल दिला आहे.

समतेचा संदेश आणि रयतेचे हित सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडाच्या पायथ्याशी वसलेल्या महाडची निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पहिल्या सत्याग्रहासाठी केली. अस्पृश्यांना पाणवठे खुले करण्यासाठी १९-२० मार्च १९२७ रोजी याच चवदार तळ्यावर केलेल्या सत्याग्रहाची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली गेली, पण आज त्याचा पुरावा म्हणजे पायऱ्यांपाशी कोरलेली एकमात्र ओळ. आंबेडकर भवन आणि सुशोभीकरणासाठी उभारलेली बाग आहे, मात्र त्या ऐतिहासिक घटनेेची सविस्तर माहिती देणारा एकही फलक नाही. हा वारसा जपण्यासाठी कोकण रिपब्लिकन या सामाजिक संंस्थेला गेल्या अनेक वर्षांपासून झगडावे लागत आहे. आधी पोहण्यामुळे दूषित होणाऱ्या या तळ्याचे पावित्र्य जपले जावे यासाठी महाड नगरपरिषदेकडे पाठपुरावा करून त्यांनी ते प्रदूषण थांबवले. आता तळ्यात झिरपणारे सांडपाणी बंद व्हावे, तळ्याचे पाणी शुद्ध करावे यासाठी ते झगडत आहेत. आतापर्यंत प्रकाश मेहता, रवींद्र चव्हाण अशा रायगड जिल्ह्याच्या प्रत्येक पालकमंत्र्यांकडे त्यांनी चवदार तळ्याच्या संवर्धनासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, कधी निधी मंजूर होत नाही तर कधी तो कोणी खर्च करावा, त्यावर कोणाचे नियंत्रण असावे यावरून दुर्दैवी वाद सुरू असल्याचे ते सांगतात. काही वर्षांपूर्वी या तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम झाले, मात्र भोवताली बांधकामे झाल्याने तळ्यातील पाणी पुरते दूषित झाले आहे

क्रांतिस्तंभालाही ड्रेनेजचा विळखा
चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेबांना मनुस्मृतीचे दहन केले ते हे मैदान. त्या ऐतिहासिक घटनेची स्मृती सांगणारा क्रांतिस्तंभ या ठिकाणी उभा आहे, पण महाड नगरपालिकेच्या उघड्या ड्रेनेजची दुर्गंधी झेलत. नजीकचे छत्रपती शाहू महाराज सभागृह आणि रमाई विहार यांचीही यापेक्षा वेगळी अवस्था नाही. यासाठीही असंख्य अर्ज-विनंत्या करून झाल्या, पण निकृष्ट बांधकाम आणि भ्रष्ट कारभारात अडकलेल्या या वास्तू विदारक परिस्थितीत दिसतात.

क्रांतिभूमी संवर्धन प्राधिकरण स्थापन करा
श्रेयांची भांडणे आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव यामुळे आतापर्यंत कोट्यवधी रुपये मंजूर होऊन, खर्च होऊन महाडमधील बाबासाहेबांच्या या ऐतिहासिक वारशाची अशी परवड झाली आहे. कधी समाजकल्याण खाते निधी मंजूर करते पण नगरपरिषद तो खर्च करू शकत नाही, कधी मालमत्तेवर नगर परिषदेचा ताबा आहे, त्याचा निर्णय समाजकल्याण घेत नाही. या गोंधळावर एकमेव उपाय आहे तो म्हणजे एकच छत्र असलेले स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करणे. रायगडाच्या संवर्धनासाठी सरकारने तसे प्राधिकरण केले आहे, तसेच महाडच्या या क्रांतिभूमीसाठी करावे, अशी आमची मागणी आहे. - प्रकाश मोरे, अध्यक्ष, कोकण रिपब्लिकन संस्था

नगरपालिकेची जबाबदारी
येथील पाणी शुद्ध करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयाने मंजुरी दिली आहे, स्थानिक नगरपालिकेला सूचना दिली आहे. नगरपालिकेने हे काम लवकरात लवकर करून घेतले पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. - रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

संवर्धनासाठी शासन कटिबद्ध
या क्षेत्राचे संपूर्ण संवर्धन होण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या स्वरूपात भरीव तरतूद करावी यासाठी मी सामाजिक न्यायमंत्री आणि पर्यटनमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थळ आहे. त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करू. - अदिती तटकरे, पालकमंत्री आणि पर्यटन राज्यमंत्री

बातम्या आणखी आहेत...