आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना - नांदेड शहर समृद्धी महामार्गास जोडण्यासाठीच्या कामांना आता गती मिळणार आहे. या कामांचा सुधारित प्रस्ताव पाठवण्याचे तसेच भूसंपादनाचे आदेश राज्य रस्ते विकास महामंडळास देण्यात आले दिले आहेत.
मुंबई ते नागपूर हा १२ जिल्ह्यांतून जाणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नांदेड जिल्ह्याशी जोडला जाणार आहे. त्यासाठी जालना ते नांदेड या द्रुतगती मार्गात सुधारणा करणे, हिंगोली गेट ते देगलूर नाका ते छत्रपती चौक या परिसरात उड्डाणपूल बांधणे तसेच गोदावरी नदीवर पूल उभारणे आदी पायाभूत कामे केली जाणार आहेत.
या कामांना आॅगस्ट महिन्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. त्याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच जारी केला आहे. ड्रोन व लिडार सर्व्हे करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
सुधारित प्रकल्प अहवाल तयार करणे, तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करणे तसेच प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास प्रस्ताव सादर करावा, असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास दिले आहेत.
समृद्धी महामार्ग नांदेड जिल्ह्याशी जोडला जावा यासाठी काँग्रेस नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे मोठा आग्रह धरला होता. नांदेड हे औरंगाबादनंतर मराठवाड्यातील महत्त्वाचे शहर आहे. तसेच या शहराला शीख धर्मीयांची दक्षिणेकडील काशी म्हणून ओळख आहे. समृद्धी महामार्गाचा या शहराला जोड मिळाल्याने तेलंगण व कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची मोठी सोय होणार आहे.
नांदेड-मुंबई, नांदेड-औरंगाबाद प्रवासाचा वेळ वाचणार
समृद्धी महामार्ग नांदेडला जोडल्याने हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांनासुद्धा थेट आणि वेगवान कनेक्टिव्हिटी मिळेल. नांदेड-मुंबई, नांदेड-औरंगाबाद प्रवासासाठी लागणारा वेळ आणि पैसा वाचेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.