आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस सेवा:अटी-शर्थींसह उस्मानाबाद जिल्ह्यातील एसटी उद्यापासून सुरू होणार, जिल्हाधिकाऱ्यांचा हिरवा कंदील

उस्मानाबाद2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • राज्य, राष्ट्रीय महामार्गावरील ढाब्यांनाही परवानगी

कोरोना विषाणुच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून तब्बल दीड महिन्यापासून बंद असलेल्या एसटी बसेसला रस्त्यावर धावण्यास जिल्हाधिकारी यांनी गुरूवारी रात्री हिरवा कंदील दाखविला आहे. मात्र, ही बससेवा ग्रीन झोन असलेल्या आपल्या जिल्ह्यांतर्गत धावणार असून यासाठी विविध अटी व शर्थीनुसार ही सेवा सुरू करण्यास लाॅकडाऊनच्या कालावधीकरीता म्हणजेच 17 मे पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

परवानगी देताना सदरील बस फक्त जिल्ह्यांतर्गतच प्रवास करतील, बसमध्ये क्षमतेच्या पन्नास टक्केच प्रवाशांची वाहतूक करणे, बसच्या प्रत्येक फेरीपूर्वी व फेरीनंतर स्वच्छता व निर्जंतुकीकरण करणे, चालक-वाहकांनी नियमित मास्क, ग्लोव्हज, गॉगल, सॅनिटायझर वापरने, स्वच्छता राखणे, बसमधील प्रवाशास तोंडाला मास्क, रुमाल बंधनकारक करणे, बसमध्ये चढ-उतार करताना सुरक्षित अंतर राखणे, बसस्थानक व परिसराची वारंवार स्वच्छता करणे, निर्जंतुकीकरण करणे, स्थानकावर गर्दी होणार नाही यादृष्टीने नियोजन करणे व विशेष म्हणजे वैद्यकीय कारण वगळता 65 वर्षावरील नागरिक, गरोदर माता व दहा वर्षाखालील बालकांना बसमध्ये प्रवासास न घेणे अशा विविध अटींच्या आधीन ही सेवा 17 मे पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्य, राष्ट्रीय महामार्गावरील ढाब्यांनाही परवानगी

एसटी बसबरोबरच जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ढाबे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या ढाब्यांना वेळेच बंधन नसले तरी विविध अटींचे पालन करून ढाबे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये सुरक्षित अंतर राखणे, हात धुण्यासाठी सॅनिटायझर, साबन व मुबलक पाणी ठेवणे, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी मास्क, ग्लोव्हज, गॉगल वापरणे आदींचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...