आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वि'मान नाकारल्याने भाजप संतप्त:सरकारी विमान कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही, महाविकास आघाडी सरकारमध्ये इतका अहंकार आला कुठून -फडणवीस

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एव्हढं सूडभावनेने वागणारं सरकार आजपर्यंत पाहिले नाही- प्रवीण दरेकर

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्य सरकारने सरकारी विमानातून हवाई प्रवासाची परवानगी नाकारल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. यावरुन आता भाजपने राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यपाल हे संविधानाने दिलेले सर्वोच्च पद आहे. अशा पदावरील माणासोबत अशी वागणूक अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यपाल विमानात बसेपर्यंत त्यांना परवानगी नाकारल्याची माहिती सांगितली नाही, हे सरकारकडून जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे. हे सरकार अहंकारी असून, राज्य सरकारकडून पोरखेळ सुरू आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातले इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं, आपण कुणाचा अपमान करतोय, हे कळालं पाहिजे, राज्यपाल संविधानिक पद आहे', अशी टीका फडणवीस यांनी यावेळी केली.

...तर जनता तुम्हाला सत्तेतून खाली खेचेल

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारने माफी मागण्याची मागणी केली आहे. याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, 'राज्यपालांचे विमान सरकारच्या माध्यमातून नाकारले असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणे योग्य नाही. सरकारने माफी मागून हा विषय इथेच थांबवावा. तुम्ही राज्यपालांना विमानातून उतरवले, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल', अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

एव्हढं सूडभावनेने वागणारं सरकार आजपर्यंत पाहिले नाही- प्रवीण दरेकर

या प्रकरणावर बोलताना विधान परिषदेचे विरोदीपक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, 'एव्हढं सूडभावनेने वागणारं सरकार आजपर्यंत पाहिले नाही. राजकारण आणि सूडभावना समजू शकतो. पण राज्यपाल हे संविधानिक पद आहे, त्याची गरिमा राखयला हवी होती. मात्र सूडभावना किती नसानसात भरली आहे, हे ठाकरे सरकारने दाखवून दिले', असे दरेकर म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचे समोर आले आहे. राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नाही. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचे कळाले.

बातम्या आणखी आहेत...