आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​काेराेनाच्या पार्श्वभूमीवर बडगा:महिला तहसीलदारांकडून ‘स्टिंग ऑपरेशन’; नियम धाब्यावर, 10 हॉटेलांना 50 हजार दंड

माजलगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्बंध तरीही माजलगावात रात्री 11 वाजेनंतरही हॉटेल हाऊसफुल्ल

वीकेंड लॉकडाऊन असताना आणि ग्राहकांना केवळ पार्सल सुविधा देण्याची परवानगी असतानाही माजलगाव तालुक्यात रात्री ११ वाजेनंतरही अनेक हॉटेल हाऊसफुल्ल असतात. शनिवारी रात्री तहसीलदार वैशाली पाटील यांनी हॉटेलांना सरप्राइज व्हिजिट करून स्टिंंग ऑपरेशन केले. दहा हॉटेल ११ वाजेनंतरही सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी या हॉटेलांना प्रत्येकी पाच हजारप्रमाणे ५० हजार रुपयांचा दंड ठोठावत कारवाईचा बडगा उगारला.

जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली अाहे. आष्टी, पाटोदा, शिरूर व गेवराई पाठोपाठ बीड तालुक्यात आता रुग्णवाढ होत आहे. शनिवार व रविवार हे दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन असताे. या काळात हॉटेलमालकांना ठरावीक वेळेत केवळ पार्सल सुविधा देण्याची परवानगी आहे. ग्राहकांना हॉटेलमध्ये बसवून जेवण देण्यास मनाई केलेली असतानाही नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. माजलगाव तालुक्यात रात्री ११ वाजेनंतरही अनेक हॉटेल्स उघडी असतात. शनिवारी रात्री तहसीलदार पाटील यांनी पथकांसह हॉटेलांना सरप्राइज व्हिजिट केली. यावेळी ११ वाजेनंतरही अनेक हॉटेल्स ग्राहकांनी भरलेली त्यांना दिसून आली. पाटील यांनी १० हॉटेलांना प्रत्येकी ५ हजार या प्रमाणे ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

यांची कारवाई : तहसीलदार पाटील यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार साबणे, शिवहर शेटे, तलाठी गोरे, तलाठी रामकिसन इंगळे, तलाठी केरबा तपसे यांचा समावेश होता.

या हॉटेलांवर झाली कारवाई
पात्रुड येथील सदिच्छा हाॅटेल, शिंदेवाडी येथील माउली हाॅटेल, हाॅटेल रविराज, नित्रुड‌ येथील विसावा, हाॅटेल मैत्री, दिंद्रुड येथील व्यंकटे हॉटेल, घळाटवाडी येथील विशाल बिअर बार, माजलगावातील गार्डन व्हॅली रेस्टॉरंट व देशमुख ज्यूस सेंटर अशा १० हॉटेलचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी ५ हजार दंड वसूल केला.

दिव्य मराठी Explainer
का झाली यंत्रणा सतर्क?

माजलगावमध्ये अद्याप फार रुग्णवाढ नाही. परंतु बाजूच्या तालुक्यात रुग्णवाढ हाेत अाहे. येत्या काळात रुग्णवाढ होण्याची शक्यता असल्याने जिल्हाभरात यंत्रणा सतर्क झाली.

का हाती घेतली माेहीम?
कोरोनाविषयक नियमांचे होणारे सर्रास उल्लंघनाने आता प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईची मोहीम हाती घेतली.

हाॅटेलवाल्यांसाठी नियमावली काय?
वीकेंड शनिवार, रविवारशिवाय इतर दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हाॅटेल सुरू राहतील, पण बैठक क्षमतेच्या निम्मेच लाेकांना बसण्याची मुभा. पार्सलही सुरू.

इतर तालुक्यातही मोहीम राबवावी
सर्व तहसीलदारांसह महसूल व पाेलिस कर्मचारी यांनी जातीने लक्ष घालून छुप्या पद्धतीने चालणाऱ्या हाॅटेलांवर कारवाई केल्यास काेराेना लवकरच राेखता येईल.

वेळप्रसंगी गुन्हे नोंदवणार : सध्या माजलगाव तालुक्यात फारशी रुग्णवाढ नसली तरी रुग्णवाढ होणारच नाही असे नाही. जिल्ह्यात इतर तालुक्यांत रुग्णवाढ दिसून येत आहे. नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढे नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाया सुरू राहतील. वेळ प्रसंगी गुन्हेही नोंदवणार असल्याचे तहसीलदार वैशाली पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...