आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून टोलवाटोलवीचे राजकारण बंद करा : छत्रपती संभाजीराजे

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड | खा. छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाच्या मूकमोर्चाला शुक्रवारी असा प्रचंड प्रतिसाद मिळाला. - Divya Marathi
नांदेड | खा. छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाच्या मूकमोर्चाला शुक्रवारी असा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे. हे टोलवाटोलवीचे राजकारण बंद करा, राज्य आणि केंद्र सरकारने आपापली जबाबदारी पार पडून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला दिला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेले पत्र तफावत असल्यामुळे समन्वयकांनी फाडले. त्यामुळे काही वेळ गाेंधळाची स्थिती निर्माण झाली हाेती.

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या पहिल्या मूकमोर्चाची सुरुवात शुक्रवारी नांदेडमधून करण्यात आली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात ते बोलत होते. पुढे बोलताना खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ मराठ्यांसाठी नाही तर अठरापगड जातींना स्वराज्य दिले. तोच धागा पकडून २०० वर्षांनंतर राजर्षी शाहू महाराज यांनी १९०२मध्ये अनुसूचित जाती, ओबीसीला आरक्षण देत असताना मराठा समाजाचासुद्धा समावेश केला. गरीब मराठा हैदराबाद संस्थानात होता. त्या वेळी त्याच्यावर अन्याय झाला. त्यांची बाजू कोण मांडणार? ५८ माेर्चे काढले, पुढे काय? आपला आवाज दिल्ली, महाराष्ट्रातसुद्धा उठला पाहिजे. त्यामुळे आमचे ब्रीदवाक्य होते, आम्ही बोललो, समाज बोलला, लोकप्रतिनिधींनी बोलायला पाहिजे. प्रास्ताविक जिल्हा समन्वयक माधव पाटील देवसकर व राज्य समन्वयक राजेंद्र पोंढरे यांनी केले. या वेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार तुषार राठोड, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार माधवराव जवळगावकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रात तफावत : मुख्यमंत्र्यांनी जे पत्र आम्हाला पाठवले त्या पत्रात प्रचंड तफावत आहे. १४ जुलैचा जो जीआर आहे, त्या जीआरनुसार २०१४ ते कोरोना महामारीपर्यंत ज्या मराठा उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या त्यांना रुजू करून घ्या, असे नमूद करण्यात आले. मात्र, जात प्रमाणपत्राची पडताळणी न झाल्याने मराठा समाजातील उमेदवारांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. जर आरक्षण रद्द झाले तर जीआर काय कामाचा, असा प्रश्‍न संभाजीराजे यांनी उपस्थित केला.

अशोकराव चव्हाण यांनी राज्यात मराठा समाजासाठी २३ वसतिगृहे १५ ऑगस्टपूर्वी सुरू करू, अशी ग्वाही दिली होती. आता आतापर्यंत किती वसतिगृहे सुरू केलीत. जी वसतिगृहे सुरू झाली आहेत ती मागील सरकारच्या काळातील आहेत. ठाण्यातील एक वसतिगृह एकनाथ शिंदे यांनी स्वत: सुरू केले. त्यामुळे त्यांचे आम्ही स्वागत करतो. परंतु, अशोक चव्हाण यांनी दिशाभूल थांबवावी. प्रामाणिकपणे पत्र द्यायचे होते तर पालकमंत्र्यांनी द्यायला पाहिजे. मराठा उपसमितीचे ते अध्यक्ष आहेत, आम्ही हे मुख्यमंत्र्यांचे पत्र स्वीकारत नाही, असेही खासदार छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

नांदेडच्या सुपुत्राला भेटण्यास वेळच नाही
खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे नाव न घेता नांदेडचे सुपुत्र असा उल्लेख करून त्यांच्यावर सडकून टीका केली. दिल्लीत नांदेडचे सुपुत्र सर्वांना भेटले, पण त्यांना आम्हाला भेटण्यास वेळ मिळाला नाही. यापूर्वी मराठा मूक आंदोलन नाशिक अणि कोल्हापूर येथे पार पडले. या आंदोलनात तेथील मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते. मग नांदेडच्या आंदोलनास पालकमंत्री अशोकराव चव्हाण का उपस्थित राहिले नाहीत? त्यांच्याकडे उत्तर देण्यासाठी शब्द नाहीत. त्यामुळे ते उपस्थित राहिले नाहीत, असा आरोप खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...