आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठवाड्यात ऑक्सिजनवरील काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब चिंताजनक आहे. त्यासाठी आरोग्य प्रशासनाने ऑक्सिजन उपलब्ध असल्याची खात्री करावी. ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आरोग्य प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी आरोग्य विभागांना पत्रही पाठवले आहे.
मराठवाड्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ६ फेब्रुवारीपासून मराठवाड्यात ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ता. ६ फेब्रुवारी रोजी ३३८ रुग्ण ऑक्सिजनवर होते, तर २५ फेब्रुवारीपर्यंत ही संख्या ७३५ वर पोहोचली आहे. तीन आठवड्यांत ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांच्या संख्येत ३९७ ने वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व रुग्णालयांमधून ऑक्सिजन उपलब्ध असणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा नियमितपणे सुरू राहावा यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालय व डेडिकेडेट कोविड हॉस्पिटल येथे एक अधिकारी व स्टोअर कीपर यांची नियुक्ती करावी, त्यांच्यावर इतर जबाबदारी सोपवू नये, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी दिले आहेत. याशिवाय ऑक्सिजन तंत्रज्ञाने २४ तास कार्यरत राहून ऑक्सिजन सिस्टिममधील प्रेशर व गळती याची दिवसातून दोन वेळा तपासणी करून त्याच्या नोंदी घ्याव्यात. त्यावर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी लक्ष ठेवावे. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून नियमित पुरवठा होतो काय तसेच वाहतुकीसंदर्भात अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. मराठवाड्यातील सर्व रुग्णालयांमध्ये असलेल्या ऑक्सिजन टँकमध्ये पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन साठवला जाईल, याची दक्षता आरोग्य यंत्रणांनी घेण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी दिले आहेत. या उपाययोजनांमध्ये दिरंगाई झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही केंद्रेकर यांनी दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा
मराठवाड्यात ऑक्सिजन पुरवठा नियमित होईल याकडे जिल्हास्तरावर नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी, अन्न औषध प्रशासनाचे जिल्हास्तरीय निरीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या समितीमार्फत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बाबींचा आढावा घेण्याच्या सूचना केंद्रेकर यांनी दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.