आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कडक नाकाबंदी:पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, सीमी जॉर्ज यांच्या दुर्गावताराने कोरोना नियंत्रणासह वाळू-दारू तस्करीला चाप

सोलापूर15 दिवसांपूर्वीलेखक: यशवंत पोपळे
  • कॉपी लिंक
  • आरोग्य यंत्रणेतील अवैध धंद्यांसह, वाळू आणि दारू तस्करीलाही चांगलाच चाप बसला आहे.

दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणताना कर्नाटक-महाराष्ट्र राज्यांच्या सीमेवर दोन्ही राज्यातील लोकांची खुले आम ये-जा सुरू होती. कर्नाटकातील कलबुर्गी, महाराष्ट्रातील सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण त्यामुळे वाढले होते. हजारो रुग्णांनी आपला जीवही गमावला. त्या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि कलबुर्गीच्या पोलिस अधीक्षक सीमी मरियम जॉर्ज यांनी कारवाई व जनजागृती करण्यासाठी दोन्ही राज्यांच्या सीमांवर कारवाईत समन्वय ठेवला. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा चोवीस तास सील केल्या. परिणामी दोन्ही राज्यांच्या सीमा भागात वाढत चाललेली कोरोना विषाणू संसर्गित रुग्ण संख्या नियंत्रणात येत आहे. विशेष म्हणजे दोन्ही जिल्ह्याच्या या पहिल्याच महिला पोलिस अधीक्षक आहेत.

कर्नाटकातील कलबुर्गी आणि विजयपूर येथील खासगी आरोग्य सेवांच्या तुलनेत सोलापूर शहरातील आरोग्य सुविधा चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून कर्नाटकातील कोरोनासह विविध आजारांचे शेकडो रुग्णांचा उपचारासाठी सोलापूर शहराकडे येण्याचा कल असतो. तो अलीकडच्या काळात कमी झाला आहे. कारण कलबुर्गी आणि विजयपूर शहरांच्या शासकीय रुग्णालयामध्ये कोरोना उपचारासाठी शासनाने दुसऱ्या लॉकडाऊनपासून सुविधा वाढवल्या आहेत. महाराष्ट्रातील असंख्य श्रीदत्तभक्त गाणगापूर, ता. अफझलपूर, जि. कलबुर्गी येथे कोरोना नियमांना फाटा देत राज्यांच्या सीमा ओलांडून दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत होते. यात सीमेवरील दोन्ही राज्यांच्या पोलिसांचे ‘हात ओले’ करण्याचे प्रकार वाढले होते, आता ते पूर्णपणे आटोक्यात आले आहे. एप्रिल आणि मे महिन्यात कर्नाटकात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार सोलापूरच्या तुलनेत खूप कमी झाल्याचे चित्र होते.

सोलापुरातील काही औषध विक्रेत्यांनी कर्नाटकातील व्यावसायिकांना हाताशी धरून सोलापूरच्या रुग्णांना अव्वाच्या सव्वा किमतीला इंजेक्शन पुरवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर केला होता. त्यात कलबुर्गी आणि विजयपूर जिल्ह्यांच्या सीमा भागात दोन्ही राज्यांतील काही एजंट रेमडेसिविर इंजेक्शन आणि रुग्णांवरील उपचारासाठी सोलापुरातील काही हॉस्पिटल्सशी संधान साधून दलाली करत असल्याचेही कर्नाटक पोलिस यंत्रणेच्या लक्षात आले. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि सीमी मरियम जॉर्ज यांच्या कर्नाटक - महाराष्ट्र सीमेवरील कडक नाकेबंदीमुळे महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमांवर आरोग्य यंत्रणेतील अवैध धंद्यांसह, वाळू आणि दारू तस्करीलाही चांगलाच चाप बसला आहे.

तेजस्वी सातपुते (सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षक)
सोलापूर जिल्ह्यालगत सर्व बाजूच्या 23 सीमांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यापैकी 18 सीमा या महाराष्ट्र राज्यातीलच पुणे, सातारा, सांगली आणि अहमदनगर या जिल्ह्यांना जोडणाऱ्या आहेत. कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या एकूण पाच सीमा आहेत. प्रामुख्याने कलबुर्गी आणि विजयपूर जिल्ह्याच्या सीमेवर ये-जा करणाऱ्या दोन्ही राज्यातील नागरिकांना पूर्णत: रोखण्यात यश आले आहे. वेळोवेळी सर्व सीमांची पाहणीही केली आहे.

सीमी मरियम जॉर्ज (कलबुर्गी जिल्हा पोलिस अधीक्षक)
कलबुर्गी जिल्ह्याच्या आंतरराज्य सीमेवर एकूण 14 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या जिल्ह्यांच्या सीमेवर प्रामुख्याने तेलंगणा आणि महाराष्ट्र या दोन राज्याच्या सीमा आहेत. त्यात सोलापूर जिल्ह्याशी कलबुर्गी आणि विजयपूर जिल्ह्याला एकूण सहा सीमा आहेत. या ठिकाणी पूर्णत: नाकाबंदी करण्यात आली आहे. सीमांवरून कर्नाटकात प्रवेश केलेल्या सुमारे दोन हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

.

बातम्या आणखी आहेत...