आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:पार्थ पवारच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही; शरद पवारांनी नातवाला जाहीररीत्या फटकारले

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास, पण सीबीआय चौकशीला विरोध नाही'

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि आजोबा शरद पवार यांनी जाहीररीत्या फटकारले. 'माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे,' असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.

पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. याबाबत शरद पवार म्हणाले की, 'माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही. तो इमॅच्युअर आहे. माझा महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, कुणाला सीबीआय चौकशीची गरज वाटत असेल तर त्यालाही काही विरोध नाही.' अशी स्पष्टोक्ती शरद पवारांनी केली.

मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास, पण सीबीआय चौकशीला विरोध नाही

यावेळी शरद पवार म्हणाले की, 'मी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना 50 वर्षांपासून ओळखतो. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. कुणी काय आरोप केले, याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. माझ्यासाठी हा विषय तितका महत्त्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली, तर निश्चितच दु:ख होतं, पण याची चर्चा ज्या पद्धतीने होत आहे, मला त्याबद्दल आश्चर्य वाटतं आहे. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. चौकशी करायची असेल, सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल, तर मी विरोध करणार नाही,' असे पवार म्हणाले.

काय म्हणाले होते पार्थ पवार ?

पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. 'सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची हीच भावना आहे. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती केली, की राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सीबीआय चौकशी सुरु करावी', असे पार्थ म्हणाले होते. आपल्या ट्विटमध्ये पार्थ पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केले होते.