आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल समितीने काल सादर केला. त्यांच्या शिफारशीनुसार या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांची बदली, एसएनसीयूच्या विभाग प्रमुख तसेच परिसेविका यांच्यावर निलंबनाची आणि दोन अधिपरिसेविका व एक बालरोगतज्ज्ञ यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
दरम्यान या दुर्घटनेचा बोध घेऊन राज्य शासनाच्या मार्फत राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांचे 15 दिवसात हेल्थ ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य आयुक्त डॉ.रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर कृती आराखडा तयार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी सांगितले. जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून आरोग्यसंस्थांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सर्व पालकमंत्र्यांना पत्र देण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, चौकशी समितीच्या अभिप्रायानुसार एसएनसीयूमधील इलेक्ट्रीक सक्रीटमध्ये आग लागल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. या दुर्दैवी घटनेत दहा नवजात बालकांचा मृत्यु झाला. नागपूर विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या घटनेची चौकशी केली. त्यामध्ये या कक्षाची जबाबदारी असलेल्या वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि त्यांच्यावर पर्यवेक्षणाची जबाबदारी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निलंबन आणि सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते यांना निलंबित, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिला बडे यांची अकार्यकारी पदावर बदली, वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची, परिसेविका ज्योती भारसकर यांच्यावर निलंबनाची तर कंत्राटी अधिपरिसेविका स्मिता आंबिलडुके आणि शुभांगी साठवणे यांच्यावर सेवा समाप्तीची कंत्राटी बालरोग तज्ज्ञ डॉ.सुशिल अंबादे यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.