आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूढ:क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईलच्या अकाली मृत्यूमागे विषबाधेचा संशय, पोलिस महासंचालकांमार्फत होणार चौकशी

मुंबई, नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आर्यनप्रकरणी एनसीबी, समीर वानखेडेंवर मांडवलीचा केला होता आरोप

कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार प्रभाकर साईल याचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शरीराने धडधाकट आणि केवळ ३७ वय असलेल्या साईलच्या अकाली मृत्यूबद्दल संशय व्यक्त करण्यात येत असून याप्रकरणी पोलिस महासंचालकांमार्फत चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. दरम्यान, साईलच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून त्याला स्लो पॉयझनिंगमुळे हृदयविकाराचा झटका आला किंवा कसे याची तपासणी करण्यात येणार आहे.

क्रूझ ड्रग्ज कारवाईत सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. या कारवाईतील साक्षीदार पंच किरण गोसावी याचा प्रभाकर साईल हा बॉडीगार्ड होता. या कारवाईवेळी मुंबई एनसीबीला २५ कोटी व त्यापैकी ८ कोटी रुपये तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांना देण्यासाठी मांडवली करण्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप साईल याने केला होता. साईल चेंबूर उपनगरातील माहूळ भागात पत्नी, दोन मुलांसोबत राहत होता. शुक्रवारी दुपारी त्याच्या छातीत वेदना सुरू झाल्याने स्थानिक इस्पितळात दाखल करण्यात आले. तिथे त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु शुक्रवारी दुपारी ४ वाजता त्याचा मृत्यू झाला.

आर्यन खान खटल्यास कलाटणी देणारा प्रभाकर
क्रूझ ड्रग केसमध्ये आर्यन खानला अटक करताना प्रसिद्धीच्या झोतात आलेला के. पी. गोसावी याचा सुरक्षा रक्षक व चालक म्हणून प्रभाकर काम करीत होता. अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईवेळी पंचनाम्यावर किरण गोसावीसोबतच प्रभाकरची पंच म्हणून स्वाक्षरी आहे. काही दिवसांनी गोसावी यात वानखडेंच्या वतीने खान कुटुंबासोबत मांडवली करीत असल्याचे प्रतिज्ञापत्रक करून प्रभाकरने एनसीबीच्या विरोधात प्रसिद्धिमाध्यमांना मुलाखती दिल्या होत्या. एनसीबीच्या अनेक अटकसत्रांत अशाच प्रकारे पंच म्हणून आपल्या स्वाक्षऱ्या घेतल्याचे त्याचे म्हणणे होते. प्रभाकरच्या या जबानीमुळे आर्यन खान खटल्यास मोठी कलाटणी मिळाली होती.

कुटुंबीयांची मागणी नसूनही उत्तरीय तपासणी, व्हिसेरा ठरणार निर्णायक
केवळ आर्यन खान प्रकरणच नव्हे तर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांबाबतही साईलची महत्त्वाची भूमिका असल्याने कुटुंबीयांची मागणी नसतानाही महत्त्वाच्या खटल्यातील पंच व साक्षीदार या भूमिकेतून पोलिस महासंचालकांच्या आदेशाने त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्याचा व्हिसेरा पुढील तपासासाठी पाठवण्यात आला असून त्याला आलेला हृदयविकाराचा झटका स्लो पॉयझनिंगमुळे आला की कसे, याची तपासणी होईल.

ड्रग्ज केसमुळे नोकरीसाठी वणवण
ड्रग्ज खटल्यात अडकल्याने प्रभाकरला नोकरी मिळाली नाही, बेरोजगारी व कुटुंबाच्या पालनपोषणाच्या जबाबदारीमुळे तो तणावात असल्याचे त्याचे वकील तुषार खंदारे यांचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रभाकर यांच्या पत्नी पूजा यांनी हा मृत्यू नैसर्गिक असून आपल्याला काहीही शंका नसल्याची प्रतिक्रिया दिली.

पोलिस महासंचालकांमार्फत चौकशी
पंच साईल याच्या मृत्यूनंतर संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली असून यामागचे नेमके सत्य काय आहे हे समोर येण्यासाठी या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत चौकशी अहवाल येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...