आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘तौक्ते’चा फटका:​​​​​​​पोल्ट्री हब असलेल्या रायगड जिल्ह्यात कुक्कुटपालन व्यवसायाचे नुकसान

अलिबाग, पेण (महेश जोशी, नितीश गोवंडे)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नियम : प्रतिपक्षी ५० रुपयांप्रमाणे १०० कोंबड्यांसाठी ५ हजार रुपयांपर्यंतचीच मदत
  • वास्तव : २५० पोल्ट्रीतील हजारो कोंबड्यांचा मृत्यू, ३.५ कोटींच्या नुकसानीचा अंदाज

राज्यातील पोल्ट्री हब म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्याला “तौक्ते’ चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. २५० च्या वर पोल्ट्रीजमधील हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला असून, ३ ते ३.५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे प्रति पक्षी ५० रुपयांप्रमाणे जास्तीत जास्त १०० कोंबड्यांना ५ हजार रुपयांपर्यंतचीच मदत मिळते. तर पोल्ट्रीच्या इमारतीच्या नुकसानीचा पंचनाम्यात समावेश होत नाही. “निसर्गा’मुळे झालेल्या नुकसानीची रक्कम अजून मिळालेली नाही. आताही असाच विलंब होणार असेल तर आत्महत्येस परवानगी तरी द्या, अशी व्यावसायिकांची मागणी आहे.

“तौक्ते’ चक्रीवादळाने पोल्ट्री व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. यानंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकणात राजकीय दौरे सुरू झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नंतर शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात दाखल झाले. मात्र, कोकणात शेती, मासेमारी आणि पर्यटनानंतर सर्वाधिक उलाढाल असणाऱ्या पोल्ट्री उद्योगाला एकाही नेत्याने भेट दिलेली नाही.

संकट संपत नाहीत : गेल्यावर्षी कोरोनाचे संकट सुरू झाल्यावर कोंबड्यातून रोग पसरतो अशा अफवा आल्या. कोंबड्यांची मागणी घटली. काेरोनाचा कहर वाढल्यावर लॉकडाऊनमध्ये इच्छा असतानाही ग्राहकांना कोंबडी घेणे शक्य होत नव्हते. काही दिवसात बर्ड फ्लू आला. जिवंत कोंबड्या मारून टाकाव्या लागल्या.

पत्रे उडाले, पक्षी मेले
मनोज दासगावकर यांचे रामराज महान येथे अद्ययावत पोल्ट्री फार्म आहे. “तौक्ते’ने याचे ३७ पत्रे उडाले, १०० च्या वर पक्ष्यांचा मृत्यू झाला. पोल्ट्री झाकण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक फाटले, वीजपुरवठा खंडित झाला, पाण्याच्या पाइपलाइन तुटल्या तर तुसाचेही नुकसान झाले. मनोज यांचे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यात २५० च्या वर पोल्ट्री व्यावसायिकांना असा फटका बसला असून यात ३ ते ३.५ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

लाखाे लाेकांची उपासमार
जिल्ह्यातील १६०० पोल्ट्री फार्ममध्ये ८०० कुटुंबांतील ५००० हजारांहून अधिक लोक काम करतात. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या सुमारे २५ हजार लोकांवर उपासमारीची वेळ आली. तर किरकोळ विक्रेते, ट्रेडर्स, मालाची वाहतूक करणारे अशा २५ हजार जणांचे काम थांबले आहे. त्यांच्या कुटुंबातील सुमारे १.२५ लाख लोकांचे हाल होत आहेत.

‘निसर्ग’ला नियमांचा फटका
निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यातील १६०० पैकी ८० टक्के पोल्ट्रीचे नुकसान झाले होते. शासकीय पंचननाम्यानुसार ५४० पोल्ट्रीच्या नुकसानीची नोंद आहे. प्रत्यक्षात ही संख्या ८०० च्यावर अाहे. शासन दरबारी ७.८ कोटींच्या नुकसानीची नोंद आहे. ती अजून मिळाली नसल्याचे रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्थेचे अध्यक्ष अनिल खामकर म्हणाले.

मदतीसाठी याचना
पोल्ट्री व्यावसायिकांनी “निसर्ग’ नंतर खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारे, मदत व पुनर्वसन विजय वडेट्टीवार, ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांची भेट घेऊन मदत मागितली. तौक्तेच्या नुकसानीचे निवदेन फडणवीस आणि दरेकर यांना दिले. पण कोणीच प्रतिसाद दिला नाही.

कर माफ करा
पोल्ट्री शेतीपूरक व्यवसाय असताना त्यास वीज बिल आणि ग्रामपंचायतीचा कर व्यावसायिक दराने आकारला जातो. तो शेतीपूरक व्यवसायाच्या दराने आकारावा. शेड आणि पक्ष्यांना विमा संरक्षण द्यावे. कंपन्यांनी ते सध्या बंद केले आहे. मांसल पक्ष्यांना हमीभाव द्यावा. बँकांच्या कर्जाचे हप्ते थकल्याचे न दाखवता कर्जाची पुर्नरचना करावी. गरजंूंना नव्याने कर्ज द्यावे, अशा या व्यावसायिकांच्या शासनाकडे मागण्या आहेत.

आत्महत्येची परवानगी द्या
निसर्गची नुकसानभरपाई मिळण्याआधीच “तौक्ते’चा फटका बसला आहे. शासनाने तत्काळ मागील मदत देऊन आताच्या नुकसानीचे पंचनामे करावेत. अन्यथा सामूहिक आत्महत्येची परवानगी द्या. - मनोज दासगावकर, खजिनदार, रायगड शेतकरी योद्धा कुक्कुटपालन सहकारी संस्था, खामर्ली, पेण

बातम्या आणखी आहेत...