आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Taukte Cyclone Updates: Anand Dimitti Said The Captain Of The P305 Barge Ignored The Storm Warning; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:पी 305 बार्जच्या कॅप्टनने वादळाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले; बार्जच्या दुर्घटनेत बचावलेल्या आनंद डिमट्टीने सांगितला घडलेला प्रकार

रायगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तब्बल 15 तास समुद्राच्या लाटांसोबत झुंज; डोळ्यादेखत सहकाऱ्यांचा जीव गेल्याने मनावर खोलवर परिणाम

तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात पी ३०५ बार्ज बुडाले आणि त्यात अनेक जण मृत्युमुखी पडले. १५ मे रोजी चक्रीवादळाची माहिती बार्जवरील सर्वांना मिळाली होती. कॅप्टन राकेश बल्लव यांनी वादळाचा इशारा गंभीरपणे घेतला नव्हता. त्यामुळेच ही दुर्घटना घडली, अशी माहिती या दुर्घटनेतून बचावलेला बार्जवरील फायरमन आणि गोवा हळदोणे येथील रहिवासी आनंद डिमट्टी याने दिली आहे. आनंदने तब्ब्ल १५ तास समुद्राच्या तुफानी लाटांसोबत झुंज दिली आणि मृत्यूवर विजय मिळवून तो गोव्यात परतला आहे.

मृत्यू समोर दिसत होता, मात्र एकमेकांना धीर देत होतो
पी ३०५ बार्जवर गोव्यातील हळदोणे येथील रहिवासी आनंद डिमट्टी हा २५ वर्षीय तरुण अजूनही या मानसिक धक्क्यातून बाहेर आलेला नाही. या घटनेचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. त्याच्या डोळ्यादेखत त्याच्या सहकाऱ्यांचा बुडून आणि बार्जवर आपटून मृत्यू झाला. त्याने सांगितलेली घटनेची माहिती अंगावर काटा आणणारी होती. आम्हा सर्वांना मृत्यू समोर दिसत होता. मात्र तरीही आम्ही एकमेकांना धीर देत होतो. बार्जवरील रूम क्रमांक १२९ मधून तिघा सहकाऱ्यांसह बार्जवर येऊन मीही कॅप्टन काय सूचना करतात याकडे लक्ष देऊन होतो, असे आनंदने सांगितले.

बार्जच्या मागील भागाला मोठा तडा गेला होता
सोमवार, १७ मे. दिवस. पहाटे अंदाजे पाच-साडेपाचच्या सुमारास बार्जचे दोन ॲँकर तुटले. त्यानंतर काही वेळाने उरलेले सहा अँकर तुटले. त्यामुळे बार्ज भरकटली. अजस्र लाटांच्या प्रवाहाबरोबर ती ओएनजीसीच्या अनमॅन ऑइल प्लॅटफाॅर्मला आदळताच मोठा आवाज झाला. मूळ ठिकाणापासून बार्ज अनेक नॉटिकल मैल भरकटत फिरत होती. बार्जच्या मागील भागाला मोठा तडा गेला. त्यामुळे बार्ज बुडणार हे निश्चित झाले. कॅप्टनने सकाळी अंदाजे १० च्या सुमारास बार्ज बुडण्याची शक्यता व्यक्त केली, अशी माहिती आनंदने दिली.

कॅप्टनचे आदेश : जीव वाचवायचा असेल तर उड्या मारा
सर्वांनी लाइफ जॅकेट घालून तयार राहावे, असे आदेश कॅप्टनने दिले. आम्ही जॅकेट घालून पुढील आदेशाची वाट पाहत होतो. संध्याकाळी पाचच्या सुमारास बार्ज बुडू लागली तेव्हा कॅप्टनने आदेश दिले, जीव वाचवायचा असेल तर उड्या मारा. बोटीवर २७३ लोक होते. लाइफ राफ्ट टाकण्यात आला. मात्र पाण्यात उघडल्यावर तो बार्जला आपटून फुटला. कॅप्टनने उडी मारण्याचे आदेश देताच समुद्र पातळीपासून सुमारे पन्नास मीटर उंचीवरील बार्जवरून आम्ही सर्वांनी समुद्रात उड्या मारल्या. उड्या मारताना काही जणांचे डोके हेलकावणाऱ्या बार्जला आपटले. त्यामुळे काहींचा त्यात मृत्यू झाला असावा.

तीन ते चार वेळा आम्हाला वाचवण्यात अपयश आले
तीन ते चार वेळा आम्हाला वाचवण्यात अपयश आले. नौदलाच्या पथकाने आमचा जीव वाचवला. आयएनएस कोची, आयएनएस कोलकाता, ऑफशोअर एनर्जी यांनी बचाव मोहीम सुरू ठेवली होती. बार्जवरील फायर ब्रिगेड टीममध्ये आम्ही एकूण तेरा जण होतो. त्यातील योगेश नावाच्या कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू झाला. गोव्यातून मी एकटाच होतो. ऑफशोअर एनर्जी जहाजातून स्क्रंबल नेटच्या साहाय्याने मला व माझ्या काही सहकाऱ्यांना वर ओढण्यात आले. १९ तारखेला यलो गेट येथे आम्हाला आणण्यात आले. पोलिसांनी आमचा जबाब लिहून घेतला व नंतर आमची वैद्यकीय तपासणी केली. २० मे रोजी मला बसने गोव्याला पाठवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...