आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी 'टेस्ला'ची अखेर भारतात एन्ट्री झाली आहे. कंपनीने कर्नाटकातील बंगळुरुमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नोंदणी केली आहे. दरम्यान, यावरुन आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे.
टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला पेज 3 मंत्र्यांना झटका" बोलाची कढी बोलाचा भात" pic.twitter.com/tvtD9CJLXT
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 13, 2021
संदीप देशपांडे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टवर म्हटले की, "टेस्ला कंपनी पळाली कर्नाटकला, पेज 3 मंत्र्यांना झटका. बोलाची कढी बोलाचा भात," अशा शब्दात देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक टीका केली. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी यापूर्वी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले होते. यासंदर्भात आदित्य ठाकरे आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी टेस्लाच्या टीमसोबत चर्चाही केली होती. यानंतर आदित्य ठाकरेंनी ट्वीटद्वारे याची माहिती दिली होती. परंतु टेस्लाने महाराष्ट्रऐवजी कर्नाटकला पसंती देत बंगळुरुमध्ये नोंदणी केली.
'टेस्ला'ची अखेर भारतात एन्ट्री
अमेरिकन कार कंपनी टेस्लाने आपल्या भारतातील पहिल्या ऑफीससाठी बंगळुरुची निवड केली आहे. यापूर्वी मस्क यांनी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. अखेर त्यांनी टेस्लाची 8 जानेवारी रोजी भारतामध्ये नोंदणी केली आहे.
टेस्ला कंपनीने बंगळुरुमधील रिचमंड सर्कल जंक्शन भागात टेस्ला कंपनीचे ऑफिस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच ठिकाणी कंपनीचे संशोधन आणि विकास ऑफिसदेखील असेल. 'टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी' असे भारतातील कंपनीला नाव देण्यात आले आहे. यासाठी कंपनीने भारतामधील कामकाज पाहण्यासाठी तीन संचालकांची नियुक्ती केली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी टेस्लाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की,'कर्नाटक ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने भारताला घेऊन जाईल. इलेक्ट्रिक व्हेइकल मॅन्युफॅक्चरर टेस्ला लवकरच बंगळुरूमध्ये आर अँड डी युनिटद्वारे आपले काम सुरू करणार आहे. मी भारत आणि कर्नाटकमध्ये इलोन मस्कचे स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.