आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

काँग्रेसचा घणाघात:प्रियंका गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भेदरलेल्या भाजप सरकारचे हीन राजकारण- बाळासाहेब थोरात

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारच्या दबावाला भीक न घालता काँग्रेस नेते जनतेचे प्रश्न मांडतील व संघर्ष करत राहतील

मोदी सरकारने प्रियंका गांधी यांची सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेणे हे दुर्देवी आहे. प्रियंका यांनी आपली आजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांचा भयानक मृत्यू पाहिला आहे. आजही गांधी कुटुंबावरील हा धोका टळलेला नसताना सुरक्षा व निवासस्थान काढून घेणे हे भाजपचे हीन राजकारण आहे. प्रियंका गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भेदरलेले भाजप सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे पण अशा कृतींना प्रियंकाजी व काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. यापुढेही जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहू व लोकशाही विरोधी केंद्र सरकारविरोधात आवाज उठवत राहू असा इशारा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

सुरक्षा व निवासस्थान काढून घेण्याच्या कृतीवर थोरात यांनी मोदी सरकारचा सडकून समाचार घेतला. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता पाहून केंद्रातील भाजप सरकार घाबरले आहे. राहुल गांधी व प्रियंका गांधी सातत्याने भाजप सरकारच्या चुकीच्या निर्णयाबद्दल जाब विचारत आहेत. त्यामुळे भाजपाची कोंडी होत असून त्यांनी प्रश्न विचारू नयेत म्हणूनच त्यांच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे. सरकारला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत म्हणून अशी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे. भाजप सरकारने अशाप्रकारे कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी प्रियंका व राहुल गांधी हे जनतेच्या हितासाठी सरकारला प्रश्न विचारतच राहतील, सामान्य जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करत राहतील असेही थोरात म्हणाले.

0