आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सातारा:साताऱ्यातील पत्रकारांनी सुरू केले पत्रकारांसाठी राज्यातील पहिले कोरोना केअर सेंटर

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक जिल्ह्यात आजही पत्रकारांना योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत

पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर आणि माथेरानचे पत्रकार संतोष पवार यांना योग्य वेळी योग्य उपचार न मिळाल्याने त्यांचे निधन झाले. त्यानंतर मराठी पत्रकार परिषदेने बाधित पत्रकारांसाठी सरकारने प्रत्येक रुग्णालयात राखीव बेडची व्यवस्था करावी अशी मागणी केली. काही जिल्ह्यात तशी व्यवस्था झाली असली तरी इतर अनेक जिल्ह्यात आजही पत्रकारांना योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. मात्र प्रत्येक गोष्टीसाठी सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा आपणच आपल्यासाठी काही करावे, थोडक्यात आत्मनिर्भर झाले पाहिजे अशी भूमिका मराठी पत्रकार परिषदेने घेतल्यानंतर अनेक जिल्ह्यात गरजू पत्रकारांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप करण्यात आले. अनेक जिल्ह्यात पत्रकारांच्या कोरोना चाचण्या केल्या गेल्या. आता सातारा जिल्हा पत्रकार संघाने तर एक पाऊल पुढे टाकत पत्रकारांसाठी स्वतंत्र कोरोना केअर सेंटर सुरू करून आत्मनिर्भर पत्रकाराच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले आहे. त्याबद्दल जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, शहर अध्यक्ष विनोद कुलकर्णी तसेच सुजीत अंबेकर यांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे कौतूक होत आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे. यापासून पत्रकार देखील अलिप्त राहिले नाहीत. काही पत्रकार बाधित झाले मात्र त्यातील अनेक पत्रकारांच्या घरी विलगीकरणाची सोय नसल्याने त्यांच्यासमोर अडचणी उभ्या राहत असल्याने जिल्हा पत्रकार संघाने पत्रकारांसाठी स्वतंत्र कोरोना केअर सेंटर उभारण्याची कल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात आणली. या कोरोना सेंटरचे आज उद्घाटन करण्यात आले. यवतेश्वर परिसरात हॉटेल निवांत येथे हे केअर सेंटर सुरू केले गेले आहे. 16 बेडच्या या केअर सेंटरमध्ये 2 ऑक्सिजन मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाने 1 डॉक्टर आणि 2 नर्सेसची व्यवस्था केली आहे. नाश्ता, जेवणाची देखील उत्तम व्यवस्था येथे करण्यात आली आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि उद्योजक सागर भोसले यांनी ऑक्सिजन मशिन उपलब्ध करून दिल्या. ज्या पत्रकारांच्या घरी विलगीकरणाची सोय नाही अशा बाधितांची या केअर सेंटर मध्ये व्यवस्था करण्यात येईल. सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या या पथदर्शी प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातील बाधित पत्रकारांना चांगले उपचार मिळणार आहेत. शिवाय ऑक्सिजन देखील उपलब्ध होणार आहे.