आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईएसआयसी:कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कामगारांच्या वारसांना मिळणार वेतनाच्या 90 टक्के रक्कम; आयुष्यभर वैद्यकीय सेवाही मिळणार

वाळूज (औरंगाबाद)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अडचणी असतील तर संपर्क साधण्याचे आवाहन

राज्य कामगार विमा योजना (ईएसआय) अंतर्गत समाविष्ट असलेल्या कामगाराचे कोरोनामुळे निधन झाल्यास त्याच्या वारसांना ईएसआयसीकडून दरमहा ठराविक रक्कम देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक नुकतेच ईएसआयसी मुख्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या पत्नी, मुलगा-मुलगी, विधवा आई यांच्यासह अन्य अवलंबितांना संबंधित कामगारांच्या सरासरी वेतनाच्या ९० टक्के आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त मृत कामगारांच्या विधवा पत्नीला दरवर्षी १२० रुपये शुल्क आकारून ईएसआयसीमार्फत आयुष्यभर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कोरोना तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वी किमान तीन महिने ईएसआयसीकडे नोंदणी असलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांनाच हा लाभ मिळणार आहे. तसेच मागील वर्षभरात किमान ७० दिवसांचे त्याचे योगदान ईएसआयसीकडे जमा असले पाहिजे. दीर्घ आजारपणामुळे रजेवर असलेले, कामावर असताना तात्पुरते अपंगत्व आलेल्या, प्रसूतीसाठी रजेवर असणाऱ्या महिला कामगारांच्या सुटीचे दिवस ही वरील ७० दिवसांच्या अटीमध्ये गृहीत धरले जातील.

या याेजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मृत कामगारांच्या वारसांनी अवलंबून असणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड, मृत व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट व मृत्यू प्रमाणपत्र सोबत घेऊन ईएसआयसी कार्यालयात संपर्क साधायचा आहे. प्रकरण दाखल झाल्यानंतर साधारण पंधरा दिवसांत मंजुरी देण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

अडचणी असतील तर संपर्क साधण्याचे आवाहन
ईएसआयसीची ही मदत याेजना सर्वसामान्य कामगारांच्या कुटुंबाला आर्थिक बळ देणारी आहे. आम्ही संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील मृत कामगारांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचणार आहोत. सध्या औरंगाबाद जिल्ह्यातील २१७ कुटुंबीयांपर्यंत पोहोचलो आहोत. यासंदर्भात कुणाला काही अडचण येत असेल किंवा अधिक माहिती हवी असेल तर ९४२२२१३९८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ईएसआयसीधारक कामगार संघटनेचे राज्य सचिव प्रकाश जाधव यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...