आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘पंगतीमध्ये वाढपी ओळखीचा असला की दोन लाडू अधिकचे मिळतात,’ अशी म्हण महाराष्ट्रात प्रचलित आहे. याचाच प्रत्यय राष्ट्रीय महामार्गांच्या कामात राज्याला येत आहे. देशात २०१४ नंतर राष्ट्रीय महामार्गांची लांबी दीडपटीने वाढली. तुलनेत महाराष्ट्रात मात्र तब्बल तीनपटीने ही लांबी वाढली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नवीन राष्ट्रीय महामार्गांची बांधणी करताना महाराष्ट्राला झुकते माप दिल्याचा फायदा झाला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या संशोधन शाखेच्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०१४ पर्यंत देशातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी ९१,२८७ किलोमीटर एवढी होती. ३१ मार्च २०२२ पर्यंत ती तब्बल १ लाख ४०,१५२ किमी झाली. त्या वेळी राज्यनिहाय महामार्गांच्या लांबीमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर होता. तेव्हा राज्यात राष्ट्रीय महामार्गांची लांबी केवळ ६,२४९ किमी एवढीच होती. आता महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे तब्बल १८ हजार ३१७ किलोमीटर एवढे लांबले आहे. सध्या देशात राष्ट्रीय महामार्गांच्या लांबीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे मंजुरी मिळून पुढील प्रक्रिया सुरू असलेले दोन मोठे ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वेदेखील महाराष्ट्रातच आहेत.
३१ मार्च २०१४ पर्यंत देशातील राष्ट्रीय महामार्गांची लांबी ९१,२८७ किलोमीटर होती. ३१ मार्च २०२२ पर्यंत त्यात ४८ हजार ८८५ किलोमीटरने वाढ झाली आहे. ती आता १ लाख ४०,१५२ किमीवर पोहोचली आहे. यंदा वर्षअखेरीस हा आकडा दीड लाख किमीपर्यंत जाऊ शकतो.
महाराष्ट्रात अजून दोन एक्स्प्रेस वे मंजूर
1 चेन्नई ते सुरत हा ग्रीनफील्ड एक्स्प्रेस वे महाराष्ट्रातून जातो. ४ राज्यांमधून जाणाऱ्या या महामार्गाची सर्वाधिक लांबी महाराष्ट्रात आहे. राज्यात या रस्त्याची लांबी ४८० किमी आहे. सध्या या महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे.
2 औरंगाबाद ते पुणे अशा सहापदरी एक्स्प्रेस वेलादेखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. सध्या या महामार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. या दोन्ही रस्त्यांसाठी राज्यामध्ये एकूण २४ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.