आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:आईसोबत बाहेर गेलेली चार वर्षांची चिमुकली आईपासून दुरावली, पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन तासात विसावली आईच्या कुशीत

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भावना हि नांदेडनाका येथे एका ठिकाणी थांबून आई हरविल्याचे सांगत रडत होती.

हिंगोली शहरातील नांदेडनाका भागात सापडलेली चार वर्षाची मुलगी हिंगोली शहर पोलिसांच्या सतर्कतेने अवघ्या दोन तासात आईच्या कुशीत विसावली. दोघींनी ऐकमेकींना पाहिल्यानंतर हंबरडाच फोडला अन तेथे उपस्थित असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डोळेही पाणावले. बुधवारी ता. 16 सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील वडद येथील अश्‍विनी बाबुराव मनोहर ह्या आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची चार वर्षाची मुलगी भावना बाबुराव मनोहर हिला सोबत घेऊन हिंगोलीत नातेवाईकांकडे आल्या होत्या. त्यानंतर अश्‍विनी व भावना परत निघाल्या. नांदेडनाका येथे भावना आईचा हात सोडून बाजूला गेली. मात्र ती सोबतच असल्याचे गृहीत धरून अश्‍विनी ह्या पुढे गेल्या. मात्र काही वेळानंतर भावना सोबत नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या घाबरून गेल्या. त्यांनी बाजारातच शोधाशोध सुरु केली.

तर दुसरीकडे भावना हि नांदेडनाका येथे एका ठिकाणी थांबून आई हरविल्याचे सांगत रडत होती. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर तिला हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, उपनिरीक्षक गंगाधर बनसोडे यांच्या पथकाने भावना हिला तिचा पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला मात्र ती रडत असल्याने तिला व्यवस्थित पत्ताही सांगता आला नाही. त्यानंतर पोलिसांनी शहरातून मुलगी सापडल्याची माहिती ध्वनीक्षेपकाद्वारे दिली. तर सोशल मिडीयावरही मुलीची माहिती दिली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अश्‍विनी मनोहर यांनी पोलिस ठाणे गाठले. मुलगी सुखरुप असल्याचे दिसताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहु लागले. दोघींची नजरानजर झाल्यानंतर दोघांनीही हंबरडा फोडला यावेळी तेथे उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डोळेही पाणावले होते. पोलिसांनी भावना हिस तिच्या आईच्या हवाली केले. यावेळी तिचे नातेवाईकही हजर होते.

बातम्या आणखी आहेत...