आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनैतिक संबंधातून सुपली (ता. पंढरपूर) येथील ६० वर्षीय भाऊसाहेब जगन्नाथ माळी यांचा पानचिंचोली (ता. निलंगा, जि. लातूर) येथे खून झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोबाइल लोकेशनद्वारे महिलेसह तिच्या दुसऱ्या प्रियकराला अटक केली.
मृत माळी हे २८ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता पैसे घेऊन येतो, असे सांगून घरून निघून गेले. मात्र, ते परत न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. याबाबत २९ मे रोजी वडील हरवल्याची तक्रार मुलगा सुशांत माळी याने पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी मोबाइल लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला. मृत भाऊसाहेब माळी यांचे शेवटचे मोबाइल लोकेशन निलंगा तालुक्यात निदर्शनास आले. पंढरपूर पोलिसांनी निलंगा पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पानचिंचोली येथे सापडलेला मृतदेह भाऊसाहेब माळी यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.
भाऊसाहेब जगन्नाथ माळी याचे साधना चंद्रकांत धुमाळ (४०, रा. दत्त मंदिराजवळ, सांगोला रोड, पंढरपूर) या महिलेशी अनैतिक संबंध होते. यातून माळी हे त्या महिलेच्या घरी वेळी-अवेळी जात होते. त्यामुळे त्यांच्यात वादही होत होते. दरम्यान, या महिलेची निलंगा येथील अमरनाथ अशोक किने (२३) या कारचालकाशी ओळख झाली. साधना धुमाळ हिने मृत माळी यांना अमरनाथ याच्या कारमधून २८ मे रोजी लातूरकडे नेले. तेव्हा ८ वाजून ४९ मिनिटांनी माळी यांचा शेवटचा कॉल होऊन फोन बंद झाला. पानचिंचोली येथे आल्यानंतर कारमध्येच साधना धुमाळ हिने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून माळी यांचा खून केला. नंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून दिला. निलंगा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटत नसल्याने बेवारस मृत्यू म्हणून अंत्यसंस्कार केले होते. आता याप्रकरणी पुन्हा तपास सुरू करण्यात आला आहे.
पुरलेला मृतदेह ताब्यात घेणार
याप्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. भानुदास माळी यांचे नातेवाईक निलंगा येथे गेले असून पुरलेला मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती निलंगा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. आर. शेजाळ यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.