आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अशिक्षित असलेल्या मातेने दुसऱ्यांच्या शेतात रात्रंदिवस राबून कष्ट करत, हलाखीच्या परिस्थितीत मुलाला शिक्षण दिले. स्वतः अशिक्षित असताना मुलाच्या जीवनात सुख यावे, यासाठी झगडणाऱ्या आईच्या प्रयत्नांना यश येऊन मुलाने वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेतले. एमबीबीएस व एमएसपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून आता आरोग्य खात्यात शल्यचिकित्सक पदावर कार्यरत आहे. गोदाबाई थोरात या मातोश्रीने जिद्द व परिश्रमाने मुलाला घडवले. तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील गोदाबाईंचा गुंजोटी येथील प्रभू थोरात यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना रमेश या मुलासह सखूबाई व ढमाबाई अशा दोन मुली आहेत. मुलगा रमेश दहा वर्षांचा असताना पतीचे अकाली निधन झाले.
पतीच्या निधनाने गोदाबाईंवर दुःखाचा डोंगर कोसळला अन् तेव्हापासून त्यांच्या जीवनाचा संघर्ष सुरू झाला. अशा परिस्थितीत चार जणांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना आर्थिक अडचणी येत होत्या. पतीच्या निधनाने कोसळून न जाता धाडसाने स्वत:ला सावरत पतीच्या तेराव्या दिवशी गोदाबाई दुसऱ्याच्या शेतात गहू कापणीसाठी गेल्या. रोजंदारी, मोलमजुरी सुरू केली. प्रारंभी दहा रुपये रोजंदारी मिळत होती. मुलगा रमेश यांचे उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण गावातीलच श्रीकृष्ण विद्यालयात झाले. एमबीबीएसची पदवी औरंगाबाद येथील घाटी महाविद्यालयातून पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर एमएसची पदवी मुंबई येथील ग्रँट शासकीय वैद्यकीय (जे. जे.) महाविद्यालयातून प्राप्त केली. सध्या डॉ. रमेश थोरात उमरगा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात शल्यचिकित्सक पदावर कार्यरत आहेत. गोदाबाई थोरात यांचे उदाहरण इतरांसाठी प्रेरणादायी नक्कीच ठरणारे आहे.
मुलाला शिक्षणाची ओढ, अविरत कष्ट करून पुरवले पैसे
मुलगा रमेश याची शिक्षणाकडे असलेली ओढ पाहून गोदाबाईंना तीव्र इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे लग्न समारंभ आदींना फाटा देत त्यांनी अविरत कष्ट सुरूच ठेवले. त्यातही मुलाच्या शिक्षणासाठी पैसा कमी पडणार नाही याची सतत काळजी घेतली. मुलाच्या भविष्यासाठी काबाडकष्ट करून पैसा कमी पडणार नाही ही जिद्द, चिकाटी ठेवून गोदाबाईंनी कुटुंबाला हलाखीच्या परिस्थितीतून सावरले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.