आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गृहमंत्र्यांचा राजीनामा हा तर संविधानाचा विजय - याचिकादार अॅड. जयश्री पाटील

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जयश्री पाटील यांच्या याचिकेच्या अाधारावर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश सोमवारी न्यायालयाने दिले.

मंत्री असले तरी त्यांच्याविरोधात काही तक्रार असेल तर गुन्हा नोंदवला गेला पाहिजेच, नागरिकांची तक्रार पोलिसांनी घेतली पाहिजे या घटनात्मक आधारावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पायउतार व्हावे लागले आहे. हा संविधानाचा विजय आहे, असे मत अॅड.जयश्री पाटील व्यक्त केले. त्यांच्या याचिकेच्या अाधारावर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश सोमवारी न्यायालयाने दिले. याविषयी अॅड. पाटील यांच्याशी ‘दिव्य मराठी’च्या विशेष प्रतिनिधी दीप्ती राऊत यांनी साधलेला हा थेट संवाद. त्यांनी विविध प्रश्नांना या वेळी उत्तरे दिली.

प्रश्न : परमवीर सिंह यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आणि तुमच्या याचिकेवर सीबीआय चौकशीचे आदेश दिले. तुमची याचिका परमवीरसिंग यांच्या याचिकेपेक्षा वेगळी कशी आहे?

अॅड. जयश्री : परमबीर यांची याचिका त्यांच्या बदलीबद्दल होती, माझी याचिका व्यापक जनहिताच्या भूमिकेतून आहे. वाझे प्रकरणामुळे गृह खात्यातील भ्रष्टाचार उघड झाला आहे. त्यामुळे या खात्याचे प्रमुख अनिल देशमुख आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख शरद पवार या दोघांविरोधात मी मलबार हिल पोलिस स्टेशनला तक्रार केली होती. देशमुखांच्या दबावाखाली पोलिसांनी ती दाखल करून घेतली नाही म्हणून मला कोर्टात जावे लागले.

प्रश्न : तुम्ही मांडलेल्या कोणत्या मुद्द्यांचा कोर्टाच्या सकारात्मक निर्णयावर परिणाम झाला?
अॅड जयश्री : सानंदा खटला आणि पी. व्ही. नरसिंह राव या दोन खटल्यांचा दाखला मी कोर्टापुढे मांडला. सत्ताधारी मंत्री असले तरी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याचा अधिकार कोर्टाने त्यात मान्य केला आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असल्याने त्यांच्या दबावामुळे पोलिसांनी माझ्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला नाही हे मी कोर्टापुढे सिद्ध केले.

प्रश्न : ही याचिका दाखल करण्यामागे तुमची भूमिका काय होती?
अॅड. जयश्री : मी क्रिमिनोलॉजीची विद्यार्थिनी आहे, मानवी हक्क कार्यकर्ती आहे. अनिल देशमुखांनी गृहमंत्री म्हणून जनतेचा विश्वासघात केला. ते मंत्री आहेत म्हणून संरक्षण नाही घेऊ शकत. भ्रष्टाचार हा देशाला लागलेला कॅन्सर आहे. देशमुख आणि शरद पवारांनी हे समजून घ्यावे, हे संविधानाचे राज्य आहे. सीबीआय चौकशीचा कोर्टाचा निकाल हा निश्चित माझा विजय आहे, पण त्यापेक्षा तो भारतीय संविधानाचा विजय आहे. हे संविधानाचे राज्य आहे.

प्रश्न : पुढे काय होणार आहे? आपण काय सांगाल?
अॅड. जयश्री : कोर्टाने माझी तक्रार सीबीआयकडे वर्ग केली आहे. आता सीबीआयच्या अधिकाऱ्यांचे बोलावणे आल्यावर, अनिल देशमुख आणि पवार यांच्या विरोधात त्यांच्याकडे सीआर पीसी १५४ , आयपीसी १२० (ब) आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार नोंदवली जाईल.

बातम्या आणखी आहेत...