आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:संकटे झेलून शेतकरी पुन्हा उभा राहिल्याने मिळाली केळीच्या अर्थकारणाला गती

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केळी कामगार म्हणून तीन मुलांचे शिक्षण केले, तिन्ही जण मुंबईत कंपनीत नाेकरीला लागले. सुना, नातवंडे असा माेठा परिवार लाॅकडाऊन घाेषित झाल्यानंतर सगळे गावी परतले आणि इथले तर केळीचे कामही बंद झालेले. भालेराव सांगत होते, काहीच सूचत नव्हतं. रिकाम्या डाेक्यात विचारांचे काहूर. एवढ्या वर्षांत तीन महिने रिकामे राहण्याची वेळ पहिल्यांदाच अाली. अाठ दिवसांपासून केळीची कापणी अाणि वाहतूक पुन्हा सुरू झाली, त्यांच्या डाेक्यावर घडांचंं अाेझं चढलं आणि मनावरच दडपण दूर झालं. काेराेना राहिला तर राहू द्या पण काम बंद व्हायला नकाे, अशी हसत मागणी करणाऱ्या भालेराव यांना मागे सावरून त्यांच्याच वयाचे रवींद्र केदारे डाेक्यावरची केळीच्या पानाची चुंभळ सावरत सांगत होते, दररोज ३०० रुपये रोज, याप्रमाणं करा महिन्याचे किती आणि तीन महिन्यांचं नुकसान किती?

ते सांगत होते, ‘रेशनचे धान्य अाणायलाही पैसे नव्हते. केळी कापणीसाठी दरराेज इय्याला (विळा) धार लावत हाेताे. रात्री हाच इय्या गळ्यावर पडताेय का, अस वाटत हाेत. अाता काम भेटल्याने जीवात जीव अाला.’ बोलणं सुरू असतानाच माेजमाप करणारे बामणाेद फ्रुटसेल साेसायटीचे मापारी देवेंद्र भारंबेही पुढे आले. म्हणाले, मागच्या वर्षी याच भागात मी ८ लाख केळीचे घड माझ्या हाताने माेजले हाेते. यंदा सपशेल पाणी फिरले अजून १ लाख घडदेखील माेजले नाहीत. अशी वेळ कधीच आली नव्हती. खेड्यात राहताे म्हणून जगलाे, शहरात असताे तर पागल हाेण्याची वेळ अाली असती.

जवळून जाणारे केळी उत्पादक अतुल नेहेतेही चर्चेत सामील झाले. लाॅकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने त्यांना केळी मातीमाेल भावात विकावी लागली. उरली सुरली कसर वादळाने काढली. ते म्हणाले, ‘वाऱ्याने त्यांची अर्धी बाग झाेपवून टाकली अाहे. पण काय करणार उभ रहावंच लागत’.

फैजपूर-सावदा येथून पुढे १५ किलाेमीटरवर असलेल्या वाघाेदा गावात डाेक्यावरच्या केळीच्या घडाला एक हात लावून दुसऱ्या हाताने साडीच्या पदराने तोंड-नाक झाकून घेत काैशल्याबाई साेनवणे अाणि गीताबाई खराटे शेजारच्या गावात काेराेनाचे पेशंट सापडल्याबाबत अापसात बाेलत हाेत्या. त्यांना काेराेनाची नाही तर काेराेनामुळे काम बंद हाेऊ नये याचीच अधिक चिंता हाेती. केळी व्यापाऱ्यांनी कामगारांची काळजी घ्यावी, सॅनिटायझर, मास्क देण्याच्या अटीवर कामगार संघटनेने काम सुरू करण्याचा निर्णय घेतला हाेता, यापैकी काेणत्याही अटीचे पालन हाेत नसले तरी काम सुरू झाल्याच्या खुशीत कुणाचीही याबाबत तक्रार नव्हती. थेट विचारून देखील कामगारांनी या विषयावर बाेलणे टाळले. प्रत्येकाच्या डाेक्यावर ५५ ते ६० किलाे वजनाचे केळीचे दाेन-दाेन घड.

भुसावळ-बऱ्हाणपूर मार्गावर बामणाेद गावाचे शिवार अाेलांडून शेताच्या बांधावर उभ्या असलेल्या ट्रकमध्ये छत्तीसगडला पाठवण्यासाठी केळीचे कॅरेट भरले जात हाेते. ट्रकसमाेर ताणकाटा टांगलेला हाेता, गाडीभाेवती १० ते १२ जणांचा घाेळका उभा हाेता. शहरांमध्ये हल्ली महापूर अालेल्या सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लाेज अाणि फिजिकल डिस्टन्सिंग या बाबींचा तेथे तिळमात्र म्हणजे फाेटाे काढण्यापुरताही संबंध नव्हता.

केळीचा प्रवास : रेल्वे वॅगनपासून, ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी अाणि आता उकिरड्यापर्यंत
लाॅकडाऊनमुळे वाहतूक बंद हाेती, केळीचे भाव मजुरीपेक्षाही कमी झाले. १ हजार रुपये क्विंटलची केळी ३०० रुपयांवर अाली. मजुरीलाही महाग असल्याने केळीचे घड काेसळून तेथेच कुजून त्याचा चिखल झाला. लाॅकडाऊन पाठाेपाठ अालेल्या चक्रीवादळाने नुकसानीचा उरला-सुरला अध्याय देखील पूर्ण केला. गेल्या काही महिन्यात केळीचा प्रवास रेल्वे वॅगनपासून, ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी अाणि सध्या उकिरड्यापर्यंत पाेहोचला अाहे. गावागावांत, शेतांच्या बाहेर फेकलेल्या केळीचे ढीग पडून अाहेत. चिनावलच्या संजय गाढेंनी १८ हजार केळीची झाडे लावली हाेती. बाग कापणीला अाली असताना वादळाने सर्व सपाट केले. आता कोसळलेल्या बागेचा पसारा आ‌वरण्यासाठीच उत्पन्नापेक्षा जास्त खर्च येणार असल्याचं ते सांगतात. वाघाेद्याच्या जगन्नाथ नारखेडेंनी तर पाणी विकत घेऊन बागेची लागवड केली अाहे. नव्या लागवडीने वेग घेतल्याने केळीची राेपे, बेणे पुरवणारे, ठिबकवाले, अंतरमशागत करणारे सज्ज झाले. वाघाेदा येथील केळी वेफर्सचे व्यावसायिक संताेष चाैरसिया यांच्या व्यवसायानेही वेग घेतल्याचे दिसले. तर अाश्रमशाळा बंद असल्याने भगवान पावरा हे पाचवीत शिकणाऱ्या रमेशला घेऊन राेजंदारीवर दाखल झालेे. संकटे झेलून येथील शेतकरी नव्या उमेदीने उभा राहिल्याने केळीच्या अर्थकारणाला गती मिळाली अाहे.

बातम्या आणखी आहेत...