आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगलबंदी:माझे वडील अयोध्येला गेले, पण शिवसेनेने त्यांना संपवले; आमदार अतुल सावेंचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझे वडील अयोध्येला गेले, पण शिवसेनेने त्यांना संपवले, अशा शब्दांत भाजप आमदार अतुल सावे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे यांची बुधवारी औरंगाबादमध्ये स्वाभिमान सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी बाबरी मशिदीच्या आंदोलनात शिवसैनिक नव्हते असा दावा केला होता. त्याचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. यावेळी त्यांनी शिवसेनेचे मोरेश्वर सावे त्यावेळी तिथे होते, असा उल्लेख केला होता. आता सावे यांचे पुत्र आणि भाजपचे आमदार अतुल सावे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यावरूनच सवाल केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

बाबरी मशिदीच्या आंदोलनात शिवसैनिक नव्हते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘तुमच्या शहरातील भाजपचे आमदार (अतुल सावे) हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडून आले आहेत. त्यांचे वडील मोरेश्वर सावे शिवसेनेचे खासदार होते, ते व त्यांचे सहकारी कारसेवेत सहभागी होते. त्यांच्या मुलाने आपल्या पक्षातील नेत्यांना सांगावे की आपले वडील अयोध्येत गेले होते की नाही?

अन्यायाबद्दल का बोलत नाही?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा भाजप आमदार अतुल सावे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘कारसेवेत सहभागी होऊन माझ्या वडिलांनी तेव्हा शिवसेनेची लाज राखली, पण अशा हिंदुत्ववादी रामभक्त खासदाराचे शिवसेनेने मात्र राजकारणात उच्चाटन केले. प्रखर हिंदुत्ववादी मोरेश्वर सावे यांना शिवसेनेने राजकारणातून संपवले. ठाकरे कारसेवक म्हणून सावेंचा गौरव करतात; परंतु त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल का बोलत नाहीत?’

बातम्या आणखी आहेत...