आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साताऱ्यातील धक्कादायक प्रकार:सावकाराने पैशांसाठी दिड महिन्यांच्या बाळालाच उचलून नेले, 4 महिन्यांपासून ताच्याच ताब्यात होते बाळ, कुटुबीयांचा आरोप

प्रतिनिधी | सातारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जवसुलीसाठी खासगी सावकाराने चक्क दि़ड महिन्यांच्या चिमुकलीलाच घरातून घेऊन गेल्याची घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून ताब्यात ठेवलेले बाळ परत करायला हा सावकार तयार नसल्याचा आरोप बाळाच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ तपास करुन बाळाचा सुखरुप ताबा घेऊन ते आईकडे सुपूर्द केले आहे. रात्री उशिरापर्यंत जाबजबाब घेण्याची प्रक्रिया सुरु होती.

असे आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत कुचेकर कुटुंबियांनी केलेले आरोप असे की, सातारा येथील मंगळवार पेठेतील ढोणे कॉलनी येथे राहणार्‍या कुचेकर कुटुंबियासमवेत हा प्रकार घडला आहे. अभिषेक कुचेकर या युवकाने काही आर्थिक अडचणीमुळे बझार येथील संजय बाबर व अश्विनी पवार-बाबर या दाम्पत्याकडून गतवर्षी 30 हजार रुपये कर्जाऊ घेतले होते. त्यानंतर वर्षभरात अभिषेक कुचेकर याने बाबर दाम्पत्याला 60 हजार रुपये परत केले होते. एका वर्षात दुपटी, चौपटीने व्याज वसूल करुन देखील बाबर दाम्पत्याची पैशाची भूक थांबली नाही. बाबर दाम्पत्य सातत्याने 30 हजारांपोटी आणखीन पैशांची मागणी कुचेकर यांच्याकडे करतच होते.

शेवटी तर गत चार ते पाच महिन्यापूर्वी अभिषेक कुचेकर यांची दीड महिन्याची मुलगीच या बाबर दाम्पत्याने घरात येवून उचलून नेली होती. अभिषेक याची पत्नी नुकतेच जन्मलेल्या तिच्या दीड महिन्याच्या मुलीला असे कोणीतरी उचलून नेल्याने मुलीसाठी तिचे आईचे काळीज तडफडत होते. त्यामुळे कुचेकर कुटुंबियांनी गत चार ते पाच महिन्यात बाबर दाम्पत्याकडे जावून मुलीला परत करण्याची मागणी केली तरी दगडाचे काळीज असलेल्या बाबर दाम्पत्याने छोट्या मुलीला त्यांच्याच ताब्यात बेकायदेशीरपणे ठेवले होते.

अभिषेक त्याच्या मुलीला परत आणण्यासाठी संजय बाबर यांच्याकडे गेल्यावर त्याला व त्याची पत्नी पायलसह कुचेकर कुटुंबियांना बाबर दाम्पत्याकडून थेट जीवे मारण्याची धमकी दिली गेली. तसेच ही मुलगी त्यांना विकली असल्याचे सांगून अजून चार ते पाच लाख रुपये द्या व मुलगी घेवून जावा, अशी दमदाटीही बाबर दाम्पत्याकडून कुचेकर कुटुंबियांना केली जात होती. कर्जाची मूळ घेतलेली रक्कम भागवून आणखी त्यावर दुप्पट रक्कम एका वर्षात देवून छोट्या मुलीला आणखी पैशांची मागणी करत गहाण ठेवून घेतल्याचा आरोप कुचेकर कुटुंबियांनी केला आहे.

याप्रकरणी गुरुवारी कुचेकर दाम्पत्याने अप्पर पोलिस अधिक्षक अजित बोर्‍हाडे यांच्याकडे कौफियत मांडली. गुरुवारी रात्रीपासूनच पोलिस घटनेची माहिती घेवून तपास करत होते. शुक्रवारी दुपारी संबंधित मुलगी सुखरुप मिळवण्यात पोलिसांना यश आले. याबाबतची माहिती कुचेकर कुटुंबियांना देवून त्यांच्याकडे बाळ सूपूर्द केले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत संशयित आरोपी व कुचेकर कुटुंबियांची जाबजबाब घेण्याची प्रक्रिया सुरु होती.

प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू -

गुरुवारी याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला. शुक्रवारी संबंधित बाळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते सुखरूप आहे. याप्रकरणाची इत्थंभूत चौकशी सध्या सुरू आहे, अशी साताऱ्यीतल अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...