आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला मोठ्या प्रमाणात मदतकार्य केले तसेच अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. यामध्ये पीएम केअर फंडमुळे देशभरातील अनेक लोकांना आधार मिळाला. एकीकडे पीएम केअर फंडच्या माध्यमातून लोकांना सतत मदत केली जात आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात राज्य शासनाच्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा अद्यापही वापर झाला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुढे म्हणाले की, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासूनच मुख्यमंत्र्यांनी आम्ही इतक्या चाचण्या केल्या, आम्ही हे सर्वप्रथम केलं, आम्हीच या गोष्टी उपलब्ध करून दिल्या, असा कांगावा केला होता. मात्र सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, मृत्युदर वाढत असताना राज्य शासनाचा अपयशी कारभार निदर्शनास येत आहे. वैद्यकीय सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये ५५० कोटी रुपये जमा झाले होते, मात्र आतापर्यंत केवळ १३२ कोटी २५ लाख रुपयांचा वापर करण्यात आला आहे, ही मदत सुद्धा केवळ स्थलांतरित मजुरांना केली गेली. आज जेथे राज्यात नागपूर, पुणे, संभाजी नगर आणि अनेक शहरांमध्ये नागरिक कोरोनाच्या युद्धात लढताना कमजोर पडत आहेत, कारण त्यांच्याकडे निधीची कमतरता आहे. दुसरीकडे राज्यभरात गंभीर परिस्थिती उद्भवली असतानाही शासनाने या रक्कमेचा रुग्णांसाठी तसेच इतर सुविधा पुरवण्यासाठी वापर का केला नाही? ज्याठिकाणी जास्त गरज आहे, तिथे एक दमडीसुद्धा या साहाय्यता निधीमधून देण्यात आली नाही, जी फार लज्जास्पद बाब आहे.'
'गेल्या ४ ते ५ महिन्यात राज्य शासनाकडून या साहाय्यता निधीतून कोणत्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या, यावर शंका उपस्थित होते. या निधीतुन केवळ एका 16 कोटींच्या प्लाजमा थेरपीसाठी आणि 20 कोटी मुंबईतील एका रुग्णालयाला दिले गेले. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत आहे, रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे सर्व लक्षात घेता चाचण्या वाढवणं आणि बेड्सची निर्मिती करणं, व्हेंटिलेटर्स उपलब्ध करणं या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, मात्र यादेखील शासनाकडून योग्यरित्या केल्या गेल्या नाहीत, करण्याची गोष्टदेखील दूर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. वाळूजमध्ये एका कोरोना संशयित वृद्ध महिलेला झाडाखाली ऑक्सिजन सिलेंडर लावून बसवण्यात आलं होतं, इतकी वाईट परिस्थिती सध्या राज्यामध्ये आहे. हे सरकार जनतेची मदत न करता, त्यांची पर्वा न करता केवळ त्यांच्या जीवाशी खेळत आहे, जनता सर्व पाहत आहे', असेही पाटील म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.