आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • The State Has Vaccinated An Average Of 35,000 People; It Will Take 10 Years To Complete Vaccination At This Rate!

माेहीम थंडावली:राज्यात राेज सरासरी 35 हजार लाेकांनाच लस; या वेगाने संपूर्ण लसीकरणास लागणार 10 वर्षे!

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 125 दिवसांत 43 लाख नागरिकांचे झाले दाेन डाेस

राज्यातील लसीकरण मोहिमेस चार महिने पूर्ण झाले असताना २ कोटी ६ लाख २४ हजार ९३० डोस पूर्ण केल्याबद्दल राज्य सरकारकडून स्वत:ची पाठ थोपटून घेतली जात अाहे. मात्र मोहीम सुरू होऊन १२५ दिवस झाले असून दररोज सरासरी ३५ हजार नागरिकांचे लसीकरण होत अाहे. लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या फक्त ४३ लाख ८१ हजार २२२ आहे. खरेदीस विलंब झाल्यामुळे राज्यभरातील लसीकरण मोहीम आठवडाभर ठप्प झाली अाहे. त्यामुळे हाच वेग राहिल्यास १२ कोटींच्या महाराष्ट्राचे संपूर्ण लसीकरण होण्यासाठी १० वर्षे लागू शकतात, असे धक्कादायक वास्तव समोर अाले अाहे.

लसीकरणाच्या धोरणात्मक निर्णयात केंद्र सरकारने घातलेले घोळ आणि लसींच्या थेट खरेदीसाठी जागतिक बाजारपेठेत उशिरा उतरल्याने महाराष्ट्र शासनाला येत असलेले अपयश यामुळे या आठवडाभर राज्यातील लसीकरण मोहीम पूर्णपणे थंडावली आहे. राज्यात लसीकरणासाठी उभारलेल्या यंत्रणेची क्षमता दिवसाला ५ लाख डोस देण्याची आहे. मात्र, लसच उपलब्ध होत नसल्याने गेल्या १२५ दिवसांत झालेल्या पूर्ण लसीकरणाचे प्रमाण सरासरी फक्त ३५ हजार आहे. वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या १२ कोटी आहे. सध्याच्या वेगाने लसीकरण सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचे पूर्ण लसीकरण होण्यासाठी १० वर्षे लागतील.

उपलब्ध साठ्याचा विचार न करता केंद्राने राबवली लसीकरण मोहीम : सीरम
लसींचा साठा अाणि जागतिक अारोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे विचारात न घेताच केंद्राने विविध वयोगटांसाठी देशव्यापी लसीकरण मोहीम हाती घेतल्याचा अारोप सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केला अाहे. सुरुवातीला ३० कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी ६० कोटी डोसचे उद्दिष्ट होते. परंतु अामचे हे लक्ष्य पूर्ण होण्यापूर्वीच केंद्राने ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी आणि पाठोपाठ १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण अभियान सुरू केले. विशेष म्हणजे लसींचा तेवढा साठा उपलब्ध नाही हे केंद्राला ठाऊक होते, असे जाधव म्हणाले. त्यामुळे उपलब्ध साठ्याचा योग्य प्रकारे वापर करण्याचा मोठा धडाच अापल्याला यातून मिळाल्याचे ते म्हणाले.

२ कोटी ६ लाख १४ हजार ९३० डोस पूर्ण
१६ जानेवारीपासून सुरू झालेल्या या लसीकरणात आतापर्यंत २ कोटी ६ लाख १४ हजार ९३० डोस पूर्ण झाल्याचे शासनाचे म्हणणे आहे. मात्र, यातील पहिला डोस १ कोटी ६२ लाख ८८ हजार ५९४ पूर्ण झाला आहे आणि दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांची संख्या फक्त ४४ लाख ८१ हजार २२२ आहे. याचा अर्थ राज्यातील ४४ लाख ८१ हजार २२२ पूर्ण लसीकरण झाले आहे.

एका दिवसात ५ लाख लस देण्याचा विक्रम
दररोज ८ लाख लस देण्याची राज्याची क्षमता अाहे. यापूर्वी २६ एप्रिल रोजी एका दिवसात ५ लाख लस देण्याचा विक्रमही महाराष्ट्राच्या नावावर अाहे. परंतु लसींच्या तुटवड्यामुळे गेल्या अाठवडाभरापासून राज्यातील लसीकरण मोहीम थंडावली अाहे.

म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांचे‘सीटी’ऐवजी एमआरआय करा
जळगाव | म्यूकरमायकोसिसच्या संशयित रुग्णाच्या नाकात खपली आली आहे का हे तपासा, आजाराचे निदान करण्यासाठी सीटी स्कॅनऐवजी एमआरआयला प्राधान्य द्या आणि रुग्णाच्या रक्तातील साखरेवर तातडीने आणि पूर्ण नियंत्रण ठेवा, असा सल्ला म्यूकरमायकोसिस नियंत्रण प्रकल्पाचे राज्याचे प्रमुख डाॅ. आशिष भूमकर यांनी संबंधित डाॅक्टरांना दिला आहे. वेळेत आणि योग्य निदान करून गरजेनुसार शस्त्रक्रिया केल्यास आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवल्यास १०० दिवसांत या आजाराचे आपण उच्चाटन करू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने नाक, कान, घशाचे शल्यविशारद डाॅ. आशिष भूमकर (मुंबई) यांची नुकतीच म्यूकरमायकोसिसच्या नियंत्रणासाठीच्या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राज्यभरातील डाॅक्टरांचा ‘टास्क फोर्स’ तयार केला जातो आहे. त्या अनुषंगाने ‘दिव्य मराठी’ने त्यांना माहिती विचारली. त्या वेळी त्यांनी १०० दिवसांत हा आजार महाराष्ट्रातूनच नव्हे, देशातून हद्दपार करण्याचा विश्वास व्यक्त केला. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात किमान एका डाॅक्टरची टास्क फोर्समध्ये निवड करण्यात येणार असून त्या डाॅक्टरांच्या माध्यमातून या आजारावर नियंत्रण मिळविण्याचा प्रकल्प ते राबविणार आहेत.

‘एमआरआय’ने कळेल बुरशीचे स्थान : डाॅ. भूमकर यांनी या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांना सल्ला दिला आहे की, संशयित रुग्णावर उपचार करण्यापूर्वी त्याचे सीटी स्कॅन करण्याऐवजी चेहऱ्याचा एमआरआय करायला प्राधान्य द्यावे. त्यामुळे रक्तवाहिन्यांत कुठे काळी बुरशी झाली आहे हे स्पष्टपणे कळते. ती बुरशी काढून रक्तवाहिन्या मोकळ्या केल्या तरच इंजेक्शनचा उपयोग होऊ शकतो. अन्यथा, इंजेक्शन आणि औषधांचा फारसा उपयोग होत नाही. संशयित रुग्णाच्या नाकात खपली आली आहे का? यावरूनही १५ सेकंदांत या आजाराचे निदान करता येते, असेही डाॅ. भूमकर यांचे म्हणणे आहे.

मधुमेहाची पातळी रोज तपासा : डाॅ. भूमकर म्हणाले की, रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाणच या आजारासाठीचे मूळ आहे. त्यामुळे त्याकडे डाॅक्टरांनी विशेषत्वे लक्ष दिले पाहिजे. साखरेचे वाढलेले प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी डाॅक्टर रुग्णांना आठवडाभराची ट्रीटमेंट देतात. इतर वेळी ते चालू शकते; पण आता रक्तातील साखरेचे एक दिवस वाढलेले प्रमाण देखील या नव्या आजाराला आमंत्रण ठरू शकते. त्यामुळे उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी साखरेवर तातडीने नियंत्रण मिळवावे आणि रुग्णांनीही ती काळजी प्राधान्याने घ्यावी. त्यासाठी रक्तातील साखर रोज तपासावी. मधुमेह असलेल्या प्रत्येक कोरोनाबाधिताला म्यूकरमायकोसिस होईलच असे नाही; पण हा आजार झालेल्या प्रत्येक रुग्णाला मधुमेह असेलच हे मात्र खात्रीने सांगता येते, असेही डाॅक्टर भूमकर यांचे म्हणणे आहे.

कोराेना काळातील उपचार : कोरोना संसर्ग झाल्यानंतर अनेक रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन आणि स्टेराॅइड मोठ्या प्रमाणात दिले गेले असेल तर मधुमेही रुग्णांची रक्तातील साखर अनियंत्रित होते हा अनुभव आहे. त्यामुळे अशा रुग्णांना स्टेराॅइड देणे डाॅक्टरांनी टाळावे, असा सल्लाही डाॅ. भूमकर यांनी डाॅक्टरांना दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...