आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय्यत तयारी:भाविकांनी फुलणार मराठवाड्यातील तिन्ही ज्योतिर्लिंगे, आज उघडणार मंदिरांची द्वारे

हिंगोली/परळी/वेरूळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परळी वैजनाथ : मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन स्पर्श दर्शनास केली मनाई

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर सर्वत्र मंदिरे बंद करण्यात आली होती, परंतु कोरोना आटोक्यात येत असताना घटस्थापनेच्या मुहूर्तावर भक्तांसाठी मंदिरांचे द्वारे उघडणार आहेत. त्याअनुषंगाने सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी मराठवाड्यातील औंढा नागनाथ, परळी वैजनाथ व वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर गुरुवारपासून भाविकांनी फुलणार आहेत. भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे नियम पाळून सर्वांनी दर्शन घ्यावे, असे आवाहनही भाविकांना करण्यात आले आहे. बुधवारी तिन्ही ठिकाणी मंदिर उघडण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली होती.

परळी वैजनाथ : मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन स्पर्श दर्शनास केली मनाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन स्पर्श दर्शन करण्यास मनाई करण्यात आल्याचे वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी सांगितले. सध्या भाविकांना केवळ पायरीचे दर्शन घेण्यास परवानगी होती. वैद्यनाथाचे स्पर्श दर्शन घेण्याची परंपरा असून मध्यंतरी देवल कमिटीने वैद्यनाथाच्या पिंडीवर चांदीचे आवरण झाकल्याने भाविकांना स्पर्श दर्शन घेता येत नव्हते. याविरोधात भाविकांनी उपोषण, आंदोलने करून देवल कमिटीस चांदीचे आवरण काढावयास भाग पाडले होते. प्रभू वैद्यनाथ हा वैद्यांचा नाथ असून पिंडीस स्पर्श दर्शन केल्याने शरीरातील व्याधी दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. भाविकांच्या मागणीचा विचार करून स्पर्श दर्शनासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी वैद्यनाथ विकास कृती समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केली आहे.

कोरोनाचे नियम पाळून मंदिरांमध्ये मिळेल प्रवेश
औंढा नागनाथ : सात वाजता उघडेल मंदिर; एका तासात ५० जणांना दर्शन
देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे गुरुवारपासून भाविकांना दर्शन घेता येईल. मंदिर सकाळी सात वाजता उघडणार आहे. त्यासाठी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांनी बैठक घेतली. मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यात आली. याशिवाय प्रत्येक भाविकामध्ये सहा फुटांचे अंतर ठेवले जाणार आहे. मास्क असल्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच एका तासात ५० भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याचे संस्थानचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी यांनी सांगितले.

वेरूळ | येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव मंदिर गुरुवारपासून उघडण्याची तसेच आलेल्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य ती तयारी करण्यात आली आहे. सायंकाळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या चर्चा केल्यानंतर त्यांनी मंदिर उघडण्याचे तोंडी आदेश दिले असून लेखी आदेश जारी करणार असल्याचे देवस्थान अध्यक्ष शशांक टोपरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...