आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • The World Health Organization Will Now Set Up A 100 bed Mobile Hospital In A Tent In Osmanabad To Fight Corona Infection; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:कोरोनाच्या संसर्गाशी लढण्यासाठी आता जागतिक आरोग्य संघटना उस्मानाबादेत तंबूमध्ये उभारणार 100 खाटांचे फिरते रुग्णालय

उस्मानाबाद17 दिवसांपूर्वीलेखक: चंद्रसेन देशमुख
  • कॉपी लिंक
रुग्णालयाचे साहित्य उस्मानाबादेत दाखल. - Divya Marathi
रुग्णालयाचे साहित्य उस्मानाबादेत दाखल.
  • डब्ल्यूएचओचा पहिला प्रयोग, 5 राज्यांतील प्रत्येकी एका जिल्ह्याची निवड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडून देशातील पाच राज्यांत प्रत्येकी एका जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर फिरती रुग्णालये सुरू करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील हे एकमेव १०० बेडचे रुग्णालय उस्मानाबादेत लवकरच सुरू होत आहे. यासाठी लागणारे साहित्य दाखल झाले असून गरजेनुसार शहरात किंवा ग्रामीण भागात हे रुग्णालय कमी वेळेत हलवता येते. देशातील झारखंड, आसाम, ओडिशा, बिहार आणि महाराष्ट्र अशा पाच राज्यांत हा प्रयोग राबवण्यात येत आहे.

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी शासनाच्या सहभागातून फिरत्या रुग्णालयाची ही संकल्पना पुढे आली आहे. महानगरांत अनेक ठिकाणी कारोनाच्या उपचारांसाठी तंबूत कोराेना सेंटर उभारण्यात आले आहेत. परंतु, तातडीच्या उपचारांसाठी अद्ययावत सुविधांसह तंबूत उभारलेले हे पहिलेच रुग्णालय असेल. बेडपासून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हीलचेअर, स्ट्रेचरसह सर्व साहित्य संघटनेने पुरवले आहे. केवळ मनुष्यबळ, औषधी, वीजपुरवठ्याशी संबंधित साहित्य जिल्ह्याच्या प्रशासनाने पुरवावे, असे अपेक्षित आहे. काेराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागांतही अशा फिरत्या रुग्णालयाचा चांगला उपयोग होऊ शकेल.भव्य तंबूमध्ये उभारल्या जाणाऱ्या या रुग्णालयाचा कोरोना साथ ओसरल्यावर अन्य आजारांवरील उपचारांसाठीही उपयोग होऊ शकेल. उस्मानाबादेत जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असे रुग्णालय उभारण्याचे नियोजन असून यासंदर्भातील निर्णय जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या नियोजनानुसार दोन दिवसांत घेतला जाईल, असे कोविड विभागाचे नोडल ऑफिसर डॉ. आसिफ मुल्ला यांनी संागितले.

मागास जिल्ह्यासाठी मदत
राज्यातील मागासलेल्या ३ जिल्ह्यांमध्ये उस्मानाबादचा समावेश होतो. शिवाय कोरोना काळात जिल्ह्यात उपलब्ध साधनांची कमतरता जाणवली. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने उस्मानाबादची निवड केली आहे. साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून आता हा दवाखाना कुठे सुरू करायचा, याबद्दलचे नियोजन जिल्हा प्रशासन करणार आहे. -डॉ. अमोल गायकवाड, विभागीय अधिकारी, डब्ल्यूएचओ.

बातम्या आणखी आहेत...