आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण:मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नाही, विरोधी पक्ष राजकारण करत आहे- अनिल देशमुख

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने तपास केला असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंबंधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी संपूर्ण तपासात मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी केली असून सर्वोच्च न्यायालयानेही तपासात दोष आढळला नसल्याचे म्हटले असल्याचेही देशमुख म्हणाले.

यावेळी गृहमंत्री म्हणाले की, 'या सर्व प्रकरणी विरोधी पक्षाने राजकारण करण्याचा प्रयत्न केला. बिहारमध्ये लवकरच निवडणुका पार पडणार आहेत आणि त्या लक्षात ठेवून काही नेते राजकारण करत आहेत. पण सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांनी योग्य तपास केल्याचे सांगितले, असे अनिल देशमुख म्हणाले.

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, सीबीआय तपासाला महाराष्ट्र सरकार आव्हान देऊ शकणार नाही. पाटण्यात दाखल करण्यात आलेला एफआयआर सर्वसमावेश असल्याचे सांगून न्यायालयाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे.

सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिने पाटण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून केली होती. त्यावर आज न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही खटल्यांचा तपास सीबीआयने करावा असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्याचप्रमाणे या तपासात सीबीआयला मदत करण्याचे आदेश न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने निर्णयाविरोधात दाद मागण्यासंबंधी विचारणा केली. मात्र न्यायालयाने त्यासाठी नकार दिला.