आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्यासारखी माणसे:कोरोना संकट आणि तणावाच्या वातावरणात माणुसकीचा आशेचा किरण दाखवणारी ही दोन उदाहरणे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा जिल्ह्यात आदिवासी भिल्ल समाजातील परंपरा- हुसेन पालकर आणि कुटुंबीय - Divya Marathi
बुलडाणा जिल्ह्यात आदिवासी भिल्ल समाजातील परंपरा- हुसेन पालकर आणि कुटुंबीय
  • एकादशीचा उपवास, रमजानचे रोजे अन्लग्न सोहळाही हिंदू-मुस्लिम पद्धतीने
  • अमेरिकी भारतीयांकडून महाराष्ट्रासाठी आले 40 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

एकादशीचा उपवास, रमजानचे रोजे अन्लग्न सोहळाही हिंदू-मुस्लिम पद्धतीने

हुसेन पालकर, आशा बानो ही नावे एेकून कदाचित अनेकांना आश्चर्य वाटले असेल. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील अनेक आदिवासी भिल्ल कुटुंबे शेकडो वर्षांपासून हिंदूू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या परंपरा जपत आहेत. या कुटुंबामध्ये एकादशीचे उपवास केले जातात आणि रमजानचे रोजे आणि नमाजही अदा केली जाते.वसाडी गावातील ७० वर्षांचे हुसेन पालकर सांगातात, वसाडी गावात माझ्या जन्माच्या अगोदरपासून ही परंपरा सुरू आहे.

माझ्या पूर्वजांनी जे संस्कार आणि परंपरा शिकवली त्याचे पालन मी केले यापुढे माझी मुलेही करत आहेत. त्यामुळे आमच्यात नावेही अशीच ठेवली जातात. माझ्या वडिलांचे नाव नुराजी होते, तर माझ्या पणजोबांचे नाव अन्वर होते. आम्ही हिंदू धर्मातील दिवाळी, दसरा, होळी, पोळा असे सगळे सण साजरा करतो. तर न चुकता शुक्रवारची नमाज अदा करतो. संग्रामपूर तालुक्यातील अनेक आदिवासी गावांत ही परंपरा जपली जातेे. आमचे रोटी-बेटी व्यवहार देखील ही परंपरा सांभाळणाऱ्या घरातच केले जातात. लग्नाच्या वेळी देखील नवऱ्या मुलाच्या घरी मांडव पूजा होते, कुलदेवतेची पूजा होते, वरात आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील होतो. मात्र नवरीच्या घरी गेल्यानंतर मुस्लिम पद्धतीने निकाह पढला जातो. मुस्लिम धर्मातील निकाहचे सर्व नियम पाळले जातात.

वादापासून अलिप्त राहतो : दोन्ही धर्माच्या पंरपरा पाळणाऱ्या या कुटुंबांना अनेकदा मग नेमके तुम्ही कोण? हा प्रश्न विचारला जातो. तेव्हा आम्ही या वादात पडत नाही. जे पाहुणे आपल्या घरी येतील त्या पद्धतीने आम्ही त्यांचा मानपान करतो. राजस्थान राज्यात अशा प्रकारे गंगा जमुना संस्कृती असल्याचे सांगितले जाते. आमचे पूर्वज तिकडूनच आले होते. आजही दहा-बारा वर्षांनी एकदा राजस्थानहून भाट आमच्या गावाला येत असल्याचे हुसैन पालकर यांनी सांगितले.

अमेरिकी भारतीयांकडून महाराष्ट्रासाठी आले ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
भारतात निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या आणीबाणीवर मात करण्यासाठी आता अमेरिकेतील मुळ भारतीय असलेल्या ५०० डॉक्टरांनी पुढाकार घेतला आहे. टेक्सास राज्यातील ह्यूस्टन येथील इंडियन डॉक्टर असोसिएशनने तेथील भारतीयांचा एक ग्रुप तयार करून अवघ्या काही दिवसात दीड कोटींचा निधी उभा केला आहे.

विशेष म्हणजे यात महाराष्ट्रीयन डॉक्टरांनी आघाडी घेतली आहे. याच अंतर्गत महाराष्ट्रासाठी ४० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची पहिली खेप अमेरिकेतून ११ मे रोजी मुंबई मार्गे रवाना झाली असून, सोमवारपर्यंत ती महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद आणि सोलापूर येथे हे कॉन्सन्ट्रेटर पाठवण्यात येणार आहेत.

भारतात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेऊन त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी ह्यूस्टन येथे इंडियन डॉक्टर असोसिएशनची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्या भागातील सुमारे ५०० पेक्षा अधिक यात डॉक्टर जोडण्यात आले आहेत. या संघटनेच्या माध्यमातून अमेरिकेतही विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.

संघटनेचे अध्यक्ष डॉ. जिग्नेश शहा यांच्यासह सदस्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यासाठी संघटनेच्या सदस्या डाॅ. आरुषा बवरे यांनी व्हॉटस्‌अप ग्रुप तयार करून त्यावर मदतीचे आवाहन केले. त्यानुसार अमेरीकेतील भारतीयांकडून मदतीचा ओघ सुरु झाला. यामध्ये आतापर्यंत तब्बल १.५० कोटी रुपये जमा झाले आहे. तर किमान ३.७५ कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, जमा झालेल्या निधीतून भारतातील सर्व राज्यांसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर, पीपीई कीट पाठविले जाणार आहेत. भारतातील परिचीत डॉक्टर व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे साहित्य वाटप केले जाणार आहे. त्यानुसार तेथील यंत्र विक्री करणाऱ्या व्यावसायिकांशी चर्चाही झाली असून पहिल्या टप्यात ४० कॉन्संट्रेटर विमानाने महाराष्ट्रासाठी पाठविण्यात आल्याचे डाॅ. बवरे यांनी सांगितले.

मदत करणे ही आमची जबाबदारी
भारतातील परिस्थिती पहाता आम्ही स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. येथील डॉक्टरांना मदतीसाठीची संकल्पना सांगताच अनेकांनी पुढाकार घेतला. वैद्यकिय महाविद्यालयाशी किंवा स्थानिक सेवाभावी संस्थेची संपर्क साधून आम्ही मदत पाठवत आहोत. अमेरिकेत याकामी माझ्यासह महाराष्ट्राच्याच येथील डॉ. संगीता साकीया, डॉ. स्वाती जोगळेकर यांनी यात पुढाकार घेतला आहे. - डाॅ. आरुषा बवरे, टेक्सास

बातम्या आणखी आहेत...