आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आखाडा बाळापूर पोलिसांची कामगिरी:बोल्डाफाटा येथे दोन दुकान फोडून पळण्यापुर्वीच चोरटे पोलिसांच्या ताब्यात, पहाटे साडेतीन वाजता रंगला पळापळीचा खेळ

हिंगोली13 दिवसांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • पल्सर वाहन देखील चोरीचेच

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत बोल्डाफाटा येथे दोन दुकान फोडून चोरटे पळ काढण्यापुर्वीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अन पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. पोलिस अन चोरट्यांचा पळापळीचा खेळ शुक्रवारी ता.३ पहाटे साडेतीन वाजता रंगला. यामध्ये तिघे जण हिंगोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत बोल्डाफाटा येथे रॉयल कलेक्शन हे रेडीमेड कपड्याचे दुकान असून त्या बाजूलाच एक ॲटोमोबॉईल्सचे दुकान आहे.

आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी कपड्याचे दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील साहित्याची नासधूस केली विशेष म्हणजे दुकानातील लॅपटॉप फोडला. त्यानंतर कपडे बदलून त्या ठिकाणी असलेले काही रक्कम व एक होमथेटर व कपडे घेतले. त्यानंतर बाजूला असलेले ॲटोमोबॉईलचे दुकानही चोरट्यांनी फोडले.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार संजय मार्के यांच्यासह पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चोरटे हिंगोलीच्या बाजूने पळाल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी हिंगोली मार्गावर धाव घेतली. पोलिस आल्याचे पाहताच चोरट्यांनी पळ काढला. पहाटे साडेतीन वाजता चोर अन पोलिसांचा पळापळीचा खेळ रंगला. अखेर या प्रकरणात पोलिसांनी श्रीनिवास गोरे (रा. वसमत) यास ताब्यात घेतले तर इतर तिघे जण पळून गेले.

या घटनेची माहिती बोधनापोड यांनी तातडीने सहाय्यक पोलिस अधिक्षक देशमुख यांना दिली. त्यावरून देशमुख यांनी वाहतुक शाखेला सतर्कतेच्या सुचना दिल्या. वाहतूक शाखेचे जमादार वसंत चव्हाण, शिवाजी पारीसकर, फुलाजी सावळे, किरण चव्हाण, शेषराव राठोड यांच्या पथकाने वाहनांची तपासणी सुरुकेली. त्यामध्ये एक दुचाकी विना नंबरची असल्यावरून पोलिसांना संशय आला. पोलिसांनी दुचाकीवर असलेल्या तिघांनाही ताब्यात घेतले आहेत. गुन्हा दाखल होण्यापुर्वीच आखाडा बाळापूर पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु केली आहे.

पल्सर वाहन देखील चोरीचेच
या घटनेसाठी चोरट्यांनी वापरलेले पल्सर हे दुचाकी वाहन चोरीचेच असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. कुरुंदा येथून हे वाहन चोरल्याचा संशय असून पोलिसांनी या प्रकरणाचीही चौकशी सुरु केली आहे.

बातम्या आणखी आहेत...