आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:बँकेमध्ये रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्याच्या बॅगला ब्लेड मारुन चोरट्यांनी लंपास केले 2 लाख रुपये, गेल्या आठवड्यातही घडली अशीच घटना

हिंगोली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवळाबाजार येथील भारतीय स्टेट बँकेत पैसे भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्याच्या बॅगेला ब्लेड मारून चोरट्यांनी २ लाख रुपये पळविल्याची घटना आज रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारेफळ येथील शेतकरी सोपान विश्‍वनाथ भालेराव हे आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भारतीय स्टेट बँकेत २ लाख रुपयांची रक्कम भरण्यासाठी आले होते. आज जवळाबाजार येथील आठवडी बाजार असल्यामुळे बँकेत खातेदारांची गर्दी होती. त्यामुळे पैसे भरण्यासाठी ग्राहकांची रांग होती. या रांगेमध्ये भालेराव उभे होते.

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लुटले

मात्र यावेळी गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी भालेराव यांच्याजवळ असलेल्या बॅगला ब्लेड मारून बॅग फाडली व त्यातील दोन लाख रुपये घेऊन पोबारा केला. काही वेळानंतर पैसे भरण्यासाठी नंबर आल्यानंतर भालेराव यांनी बॅगेमध्ये हात घातला मात्र त्यात पैसे नसल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे ते घाबरून गेले. त्यांनी पैशाबाबत आजूबाजूला उभ्या असलेल्या खातेदारांकडे चौकशी केली. मात्र त्यांना काहीही हाती लागले नाही.

त्यानंतर भालेराव यांनी जवळाबाजार पोलिस चौकी गाठून सविस्तर माहिती दिली. हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, जमादार राजू ठाकूर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले मात्र त्यात स्पष्ट काहीही ओळखू येत नसल्याचे सुत्रांनी सांगितले.

मागील आठवड्यातही ५० हजार पळविले

मागील आठवड्यात बँकेमध्ये रांगेत उभ्या राहिलेल्या एका ग्राहकाचे ५० हजार रुपये याच पद्धतीने पळविले. त्यानंतर ही दुसरी घटना आहे. त्या चोरीचा तपास लागण्यापुर्वीच ही दुसरी घटना घडली आहे.

बातम्या आणखी आहेत...