आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवाळी संपली की तेलंगण, कर्नाटकच्या गावांतून पाणी आणावे लागते. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने पाच ते सात जणांचा जीव गेला. पाणी नाही, वीज नाही... मग गर्जा महाराष्ट्रासाठी कशासाठी, असा सवाल तेलंगण-कर्नाटक सीमेवरच्या महाराष्ट्रातील मानूर बुद्रुक (ता. देगलूर, जि. नांदेड) येथील गावकऱ्यांनी केला. शिवाय पुन्हा एकदा तेलंगणात जाण्याचा इशारा दिला.
मानूर बुद्रुकपासून हाकेच्या अंतरावरील तेलंगण आणि कर्नाटकचा कायापालट झाला आहे, मात्र, महाराष्ट्रातील गावे चुरगळून फेकून दिलेल्या कागदासारखी आहेत. जेथे तेलंगण, कर्नाटक, महाराष्ट्र या तिन्ही राज्यांच्या सीमा मिळतात ते मानूर बुद्रुक गाव. शंकरनगरच्या साखर कारखान्यावर हजारो कुटुंबे अवलंबून होती, मात्र तो बंद पडला. पुढे हानेगावमध्ये काही आडतीची दुकाने होती. त्याच्या शेजारच्या पत्र्याच्या दहा खोल्यांत मटक्याचे अड्डे आहेत. अनेक जण येथे कंगाल होतात. हे मटक्याचे अड्डे पोलिसांना मात्र दिसलेले नाहीत. तुम्हाला तेलंगणात जायचे का, या प्रश्नावर मानूर ग्रामपंचायतीत जमलेल्या सरपंचासह गावकऱ्यांनी “हो’ असे उत्तर दिले. भावनेवर किती दिवस जगायचे, असा पोलिस पाटील विष्णुकांत पाटलांचा रोखठोक सवाल. मानूर बुद्रुकची लोकसंख्या पाच हजार. येथून कर्नाटकची सीमा एक किलोमीटरवर. लगतच मानूर खुर्द कर्नाटकात. तेलंगणाची सीमाही फक्त साडेचार किलोमीटरवर. त्याला खेटून सोपूर तेलंगणात. ही गावे समृद्ध आहेत. महाराष्ट्रात मात्र रस्ते, वीज नाही, सिंचनाची सोय नाही.
चारचाकी जाण्यासारखा रस्ता नसल्याने दुचाकीवरून मानूर खुर्दकडे जावे लागले. मानूर खुर्दच्या हद्दीत जाताच रस्ता एकदम गुळगुळीत. तेलंगणातील सोपूर तीन किलोमीटरवर. फक्त दगडांचा रस्ता कसा असतो, हे पाहायचे असेल तर आपल्या नेत्यांना इकडे यावे लागेल. सोपूरची हद्द सुरू होताच पुन्हा एकदा गुळगुळीत रस्ता. कर्नाटक आणि तेलंगणामध्ये मुबलक पाणी कसे मिळते, हे गावकऱ्यांनी दाखवले. शाळेजवळ हौद बांधलेला होता. तो भरत आलेला. तेथून परत मानूरला आल्यानंतर गावकरी म्हणाले, अंतापूरकर साहेब निवडून आले. प्रचारानंतर ते इकडे फिरकले नाहीत. अशोक चव्हाण उभ्या हयातीत फक्त एकदाच येऊन गेले. भारत स्वतंत्र झाल्यापासून एकदाच रस्ता झाला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या रस्त्यांवर कार चालवावी मूलभूत सोयीच नाहीत. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. आपले मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री समृद्धी महामार्गावरून महागड्या कारमधून फिरत आहेेत. बिलकुल करा. आपल्या महाराष्ट्राचा असाच विकास होऊ द्या, आमचे काही म्हणणे नाही. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची तीच कार आमच्या या रस्त्यांवरून चालवावी. मग त्यांना आमच्या वेदना किती आहेत हेदेखील कळतील, शिवाजी शिंदे सांगत होते. गावात आरोग्य केंद्र नाही, बँक नाही, दहावीनंतर शाळा नाही. अकरावीपासून पुढील शिक्षणासाठी महाविद्यालयात पाठवायचे म्हटले तर रस्ते चांगलेदेखील नाहीत.
तेलंगणात मोफत वीज, १० हजार मदत पोलिस पाटील म्हणाले, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी चांगल्या योजना सुरू केल्या. कुटुंबातील एका व्यक्तीला ६ किलो तांदूळ, डाळ, तेल, गहू मोफत मिळते. धोबी, न्हावी, दुकानदारांना वीज मोफत आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी १० हजार व मोफत वीज मिळते. मुलीच्या लग्नाला १ लाख ११६ रुपये मिळतात. महाराष्ट्रात असे काही मिळत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.